कोपरगाव - कोपरगाव तालुक्यातील
येसगाव शिवारात मानवी धैर्य आणि जिव्हाळ्याचा एक थरारक प्रसंग रविवारी घडला.
ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला चढवल्यानंतर
त्याचे आजोबा धावून गेले आणि बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचे प्राण वाचवले.
ही घटना २९ जून रोजी सकाळी ११
वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील कोल्हे वस्तीजवळील सुराळकर
वस्तीवर घडली. मिळालेल्या माहितीनुसार,
कुणाल अजय आहेर (वय ४) हा चिमुकला सकाळी त्याची आई कामाला निघाली
असता आईच्या मागे घराबाहेर पडला. त्याच वेळी ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने
अचानक कुणालवर झडप घालत त्याला मानेवर चावा घेत उसाच्या शेतात ओढून नेले.
नातवाचा आवाज ऐकताच आजोबा
मच्छिंद्र आहेर तत्काळ उसाच्या शेतात धावले. प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्यावर
झडप मारली आणि स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नातवाला त्याच्या तावडीतून सोडवले.
या धाडसाची गावात सर्वत्र चर्चा असून आजोबांच्या पराक्रमाचे सर्वत्र कौतुक होत
आहे.
Post a Comment