नगर तालुका (प्रतिनिधी) - पंढरपूर कडे आषाढी वारी साठी दिंडीत चाललेल्या वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी उभारण्यात आलेल्या तंबू जवळ रात्रीच्या वेळी चोरी करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या वावरणाऱ्या एकास नगर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. ही कारवाई नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावात जनता विद्यालयाच्या मोकळ्या पटांगणात लावलेल्या तंबूच्या मागे २४ जून रोजी रात्री केली.
या बाबतची माहिती अशी की नगर तालुका पोलीस रात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना रुईछत्तीसी गावातील जनता विद्यालयाच्या मोकळ्या मैदानात दिंडीतील वारकऱ्यांनी रात्री मुक्कामासाठी लावलेल्या तंबूच्या मागे अंधारात दबा धरुन संशयितरित्या बसलेल्या प्रशांत रजनीकांत भोसले (वय ३०, रा, तांबे मळा, व्हीआरडीई पाठीमागे बुरूडगाव रोड, ता.नगर) यास पकडले.
त्याच्याकडे इतक्या रात्री इकडे काय करतोस अशी चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध पोलीस अंमलदार आबासाहेब झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, पोलीस अंमलदार आबासाहेब झावरे, वांढेकर, शिवाजी खरात यांच्या पथकाने केली.
Post a Comment