शिवसेना -मनसे युतीची चर्चा, उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना दिल्या महत्वाच्या सूचना...


मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. स्थानिक पातळीवर युती व आघाडीच्या शक्यतेचा अभ्यास करण्याच्या सूचनांसह, मनसेसोबतच्या युतीबाबतही ठाकरेंनी सकारात्मक भूमिका दर्शवली. 

राज ठाकरेंसोबत नाहीच जुळले तर? उद्धव ठाकरेंकडून बॅकअप प्लॅनिंगला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर मतदार याद्यांतील वाढ, बोगस नावे आणि निवडणूक यंत्रणेतील त्रुटींवर विशेष लक्ष देण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा आणि संपर्क प्रमुखांची आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात बैठक झाली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आघाडी की मनसे सोबत युती केल्याने पक्षाचा फायदा होईल, याची स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करुन येत्या एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

... स्वतंत्र लढण्यास तयार राहा

राज्यभरात स्थानिक पातळीवर युती, आघाडी करण्यासंदर्भात आढावा घ्यावा. जर युती, आघाडी झाली नाही तर सर्व जागांवर पक्ष म्हणून लढण्यास तयार राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. महिन्याभरात हा अहवाल जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख यांनी द्यायचा आहे.

युती आघाडी करण्याबाबत पक्ष निर्णय घेईल

आगामी काळात मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत. मात्र, स्थानिक पातळीवर युती, आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. स्थानिक पातळीवर कुठे आघाडी, युती करायची याबाबतचा निर्णय पक्ष घेईल. त्यामुळे महिन्याभरात हा अहवाल जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख यांनी देण्याच्या सूचना केल्या आहेत.

बोगस मतदार शोधण्याच्या सूचना

उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील संशयास्पद वाढीबाबत कार्यकर्त्यांना माहिती संकलनाचे आदेश दिले आहेत. मतदार याद्यांचा अभ्यास करा, लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतदार कसे वाढले? कुठे वाढले? बोगस मतदार शोधा? गटप्रमुखांनी 40 लाख मतदार कसे वाढले हे तपासा, मतदार याद्यांच्या घोळाबाबत माहिती समोर आणा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments