अहिल्यानगर - केडगाव औद्योगिक वसाहतीत एक अनोळखी तरूणाचा (वय अंदाजे ३० ते ३५) मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरूणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्या तरूणाची ओळख पटवून त्याचे मारेकरी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आले. दरम्यान, तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा मारहाणीमुळे मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, रविवारी (२२ जून) सकाळी ७.३० च्या सुमारास पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालणारे पो.कॉ. अर्जुन फुंदे व पो.ना. राजेंद्र आव्हाड यांच्या जवळ असलेल्या डायल ११२ एम डी टी मशीन वर कॉल आला की, इंडस्ट्रियल एरियातील रॉयल इनफिल्ड शोरूमजवळ एक अंदाजे ३० ते ३५ वयोगटाचा तरुण बेशुध्द अवस्थेत पडलेला आहे. ही माहिती मिळताच पोलिस पथक त्या ठिकाणी गेले व त्यांनी रूग्णवाहिकेतून त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. डॉ. बोठे यांच्या खबरीवरून पोलीस अंमलदार रमेश शिंदे यांनी कोतवाली पोलिसांना दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिस पथक ज्या वेळी घटनास्थळी गेले तेव्हा त्या तरुणाच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या होत्या. तसेच तो फक्त अंडरवेअर वर होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी अर्ज भरून दिला.
त्या तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृत्यू मारहाणीत झाला असल्याचा अहवाल कोतवाली पोलिसांना सोमवारी (२३ जून) सायंकाळी प्राप्त झाला. त्यामुळे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार अनोळखी व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अमोल भारती, कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी भेट दिली असून तपासाबाबत सुचना केल्या आहेत.
Post a Comment