नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर शहरात परिसरात तसेच तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसून येत आहे. नगर जवळील सोनेवाडी शिवारात आज शुक्रवारी (दि.४ जुलै) पहाटे एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. याच ठिकाणी १७ जून रोजी पहाटेच्या सुमारासही एक बिबट्या जेरबंद झाला होता. याशिवाय काळे वाडी (हिवरे झरे) व कापूरवाडी येथेही बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेले आहेत.
सोनेवाडी गावा पासून चास कडे जाणाऱ्या रस्त्यावर भूतारे वस्ती जवळ गेल्या अनेक दिवसांपासून एक मादी बिबट्या व तिच्या बछड्याचा वावर होता. या वस्ती परिसरात साधारण १० ते १२ घरे आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या पाळीव कोंबड्या, कुत्रे व शेळ्या मेंढ्या या दोन्ही बिबट्यांनी अनेकदा पळवून नेत त्यांची शिकार केलेली आहे. शेतकऱ्यांच्या पाळीव कोंबड्या रात्रीच्या वेळी घराबाहेरील झाडावर बसतात, त्या झाडावर चढून बिबट्याने या परिसरातील शक्ती माळी यांच्या घरावर दोनदा उड्या मारत कोंबड्या पळविलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शक्ती माळी यांची आई दुपारी घराबाहेर कपडे धूत असताना या बिबट्याने त्यांच्या समोरून कोंबड्यांवर झडप घालून त्या पळवल्या होत्या. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तेथे पिंजरा लावला होता.
१५ दिवसांत एकाच ठिकाणी २ बिबटे जेरबंद
त्यातील एक बिबट्या १७ जून रोजी पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. त्यानंतर पुन्हा दुसरा पिंजरा तेथे लावण्यात आला, त्यात आणखी एक बिबट्या आज शुक्रवारी (दि.४ जुलै) पहाटे जेरबंद झाला आहे. या परिसरात राहणारे शक्ती माळी यांना पिंजऱ्याच्या बाजूने डरकाळी ऐकू आल्यावर त्यांनी जवळ जावून पाहिले असता तो पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे दिसून आले. या बिबट्याने पिंजऱ्याला अनेकदा हुलकावणी दिली होती. त्यामुळे पोपट बंडू माळी यांनी शक्कल लढवत मुख्य पिंजऱ्यातच २ कोंबड्या बांधून ठेवल्या होत्या. त्यांना खाण्यासाठी बिबट्या आत गेला आणि जेरबंद झाला.
ही माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नितीन गायकवाड, वनरक्षक सुनिल धोत्रे, विजय चेमटे, बाळू रणसिंग, चालक संदीप ठोंबरे, वनसेवक सुभाष हंडोरे तसेच वन्यजीव अभ्यासक हर्षद कटारिया, प्राणीमित्र सचिन क्षीरसागर, यशोदीप गोरे, हेमंत जाधव यांनी तेथे धाव घेत पाहणी केली. त्यावेळी नर बिबट्या जेरबंद झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तो बिबट्यासह पिंजरा वाहनात घालून बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी घेवून गेले.
Post a Comment