पारनेर (प्रतिनिधी) - पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळजवळील माजमपूर येथे मंगळवारी (दि.१ जुलै) रात्री जुन्या रागातून चुलत्याने १६ वर्षीय मुलीचा डोक्यात दगड घालून खून केला. प्रतीक्षा रितेश भोसले असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेतील आरोपी हा मयत मुलीचा चुलता व चुलत आजोबा असून या संबंधीची फिर्याद बुधवारी (दि.२ जुलै) रितेश ठुल्या उर्फ सुभाष भोसले (वय ३५, रा. माजमपूर, राळेगण थेरपाळ, ता.पारनेर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी आशिष उर्फ आबड्या ठुब्या भोसले व उर्कुलस जलद्या काळे (रा. खरातवाडी, बेलवंडी, ता. श्रीगोंदा) या. दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील फिर्यादी रितेश भोसले यांचा भाऊ आशिष उर्फ आबड्या ठुब्या भोसले यांची मुलगी अस्मिता आशिष भोसले एक महिन्यापूर्वी तळ्यातील पाण्यात पडून मयत झाली होती.
त्यामुळे आशिष भोसले व त्याचा सासरा उर्कुलस जलद्या काळे यांनी फिर्यादी यांची मुलगी प्रतीक्षा हिच्यामुळेच आमच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला याचा राग मनात धरून मंगळवारी प्रतीक्षा भोसले हिच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती व निरीक्षक समीर बारवकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
Post a Comment