अहिल्यानगर - आ. संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाव्दारे एका संशयित आरोपीला तेलंगणा राज्यातून अटक केली आहे. अनिस महंमद हनिफ शेख (वय ३२, मुळ रा. रूस्लाबाद, चकलंबा, ता. गेवराई, जि. बीड, हल्ली रा. नारेगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे.
२ जुलै रोजी एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्राम अकाउंटवरून धमकीसंदर्भात दोन अश्लिल मेसेज आल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी आ. जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास साहेबराव शिरसाठ (रा. बुरुडगाव रस्ता, अहिल्यानगर) यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून 'संग्राम को दो दिन के अंदर खत्म करूंगा' असा धमकीचा मेसेज आल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या दोन्ही गंभीर प्रकरणांची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासासाठी पथक तयार करण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक अनत सालगुडे, अंमलदार फुरकान शेख, रवींद्र चुंगासे, सागर ससाणे आणि अमृत आढाव यांच्या सहभागातून हे पथक कार्यरत करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाव्दारे हा गुन्हा अनिस महंमद हनिफ शेख याने केल्याचे निष्पन्न झाले. सदर संशयित आरोपी सध्या निजामाबाद, तेलंगणा राज्यात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धग्गी (ता. जि. निजामाबाद) येथे छापा टाकून त्याला अटक केली. संशयित आरोपी अनिस शेख याने प्राथमिक चौकशीदरम्यान आपला गुन्हा मान्य केला आहे.
Post a Comment