अहिल्यानगर (प्रतिनिधी) - नगरच्या मार्केट यार्डमधील भुसार विभागातील ८ दुकाने फोडून चोरी करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहेत, तर त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. या चोरट्यांकडून मार्केट यार्ड सह नगर तालुक्यातील साकत व देहरे गावात मेडिकल दुकानांत केलेल्या चोऱ्याही उघड झाल्या आहेत. अकबर लुकमान खान (वय ३३, रा.दौला वडगाव, ता.आष्टी, जि.बीड), आर्यन पप्पु शेख (वय १९, रा.दौलावडगाव, ता.आष्टी, जि.बीड) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तर समीर बालम शेख (रा.मुकूंदनगर, अहिल्यानगर) हा फरार झाला आहे.
मार्केट यार्डमधील भुसार विभागातील ८ दुकाने २ जुलै रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरी केली होती. याबाबत संजय चुनिलाल लुनिया (वय ६१, रा.आनंदधाम, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादी वरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, शाहीद शेख, मयुर गायकवाड, रविंद्र घुंगासे, फुरकान शेख, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक नेमून समांतर तपास सुरु केला होता.
सदर पथक गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हयाचा तपास करत असताना ३ जुलै रोजी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा अकबर लुकमान खान व त्याचे साथीदारांनी केला असून ते मोटार सायकलवर राधाबाई काळे महिला महाविदयालय परिसरात येणार आहेत. ही माहिती मिळताच पथकाने तात्काळ नमूद ठिकाणी सापळा रचुन संशयीत आरोपीचा शोध घेत असताना संशयीत आरोपी अकबर लुकमान खान व आर्यन पप्पु शेखयांना पकडले तर समीर बालम शेख हा पसार झाला.
ताब्यातील आरोपींकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी मार्केट यार्ड मधील दुकानांत चोरी केल्याची कबुली दिली. ४-५ दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील साकत व मागील दोन महिन्यापुर्वी देहरे येथील मेडीकल दुकानाचे पत्रे उचकटून चोरी केल्याची माहिती सांगीतली. आरोपीने दिलेल्या माहितीवरून खालीलप्रमाणे ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Post a Comment