हिवरे बाजार (अहिल्यानगर) – हिवरे बाजार गावाने आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवला, जेव्हा भारतीय सैन्याचे वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल विक्रम वर्मा (सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल) यांनी गावाचा दौरा केला.जनरल साहेबांचे स्वागत एनसीसी कॅडेट्सनी आणि विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने वारकरी वेषभूषेत केले. या वेळी कर्नल आशीष, लेफ्टनंट कर्नल शक्ती सिंग, लेफ्टनंट कर्नल जयदीप सिंग, स्क्वाड्रन लीडर विद्यसागर आणि चंद्रकांत शिंदे उपस्थित होते.जनरल वर्मा यांनी गावात कदंब वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यांनी जलसंवर्धन योजना, कैटल फील्ड आणि अन्य विकास प्रकल्प यांची पाहणी केली.
गावातील ४० नवीन नियुक्त आदर्श ग्राम प्रतिनिधी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना संबोधित करताना जनरल वर्मा म्हणाले जर मोदीजींचं २०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल, तर देशाला हिवरे बाजारसारखी गावे आणि नेतृत्व आवश्यक आहे. जेव्हा गावे घडतात, तेव्हा राष्ट्र आपोआप घडतं.”ते पुढे म्हणाले “गाव आणि सैन्य यांचं नातं पिढ्यानपिढ्या आहे. प्रत्येक गावातून ३-४ युवकांनी सैन्यात भरती व्हावं, ही काळाची गरज आहे. माझं स्वतःचं गाव गंगा-यमुना दरम्यान आहे, पण अजूनही ते विकसित नाही.म्हणून हिवरे बाजार येथील स्वच्छता व वनराई अप्रतिम असून निवृत्तीनंतर मी माझं गाव उत्तरप्रदेशातील एक आदर्श गाव बनविणार आहे आणि के.के.रेंज जवळील ढवळपुरी गाव हे दोन्ही आदर्श बनवण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार आहे. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नवा आदर्श गाव उभा करणार आहोत.”जनरल वर्मा यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा उल्लेख केला.
“कलाम साहेब म्हणाले होते की भारताचे मुले भारताला महान बनवतील. मोदीजींचं स्वप्न आहे की २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिवरे बाजारसारख्या मॉडेल गावांचा आदर्श घ्यावा लागेल. हे स्वप्न फक्त गावागावातील युवकांच्या सहभागातूनच पूर्ण होईल.”जनरल वर्मा यांनी शाळेतील मुलांशी आणि ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला आणि गावातील विविध विकासकामाबद्दल माहिती घेतली. त्यांनी सर्व ग्रामस्थांना अहिल्यानगर आर्मी कॅम्प ला भेट देऊन तिथल्या सुविधा पाहण्याचं निमंत्रण दिलं.हा दौरा नव्याने आदर्श गाव योजनेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना नवी दिशा देणारा ठरला असून ग्रामस्थांमध्ये नवीन उमेद आणि प्रेरणा संचारली आहे.
हिवरेबाजार ग्रामस्थांच्या वतीने मेजर जनरल वर्मा यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. या वेळी सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, व्हा. चेअरमन रामभाऊ चत्तर, दुध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब गुंजाळ, हरिभाऊ ठाणगे (सर), एस.टी. पादीर (सर), रामचंद्र ठाणगे,बनशी ठाणगे(मेजर),लक्ष्मण ठाणगे,आनशाबापू ठाणगे,संजय पवार,मंगेश ठाणगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment