अहिल्यानगर – शहरातील नालेगाव येथील ‘लोकमंगल गृहनिर्माण सहकारी संस्था’च्या नावाखाली स्वस्त दरात प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवून शंभरहून अधिक नागरिकांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणात अखेर पोलिसांनी स्वतःच्या खात्यातील अंमलदार अशोक बाळु पुंड (रा. साई गजानन कॉलनी, लेखानगर, सावेडी) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी (७ जुलैपर्यंत) सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील दुसरा संशयित प्रकाश भुमय्या कोटा (रा. बालाजी सोसायटी, कल्याण रस्ता, अहिल्यानगर) याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची फिर्याद १२ जून रोजी कैलास नामपेल्ली उषाकोयल (वय ६१, रा. झारेकर गली, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केली होती. उषाकोयल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अशोक पुंड व प्रकाश कोटा यांच्याशी पूर्वीपासून ओळख होती. त्यांनी २०११ साली ‘लोकमंगल’ गृहनिर्माण संस्था स्थापन करून गरीबांना ५०० चौरस फूटाचे प्लॉट अत्यंत स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दिले.
शासन दरबारी संपूर्ण प्रक्रिया पार पाडून प्लॉट मिळतील, असा विश्वास दिला. यावर विश्वास ठेवून फिर्यादी त्यांच्या व नातेवाइकांकडून रोख स्वरूपात सुमारे ७.२५ लाख रूपयांची रक्कम जमा करण्यात आली. मात्र, दीर्घकाळ लोटूनही प्लॉटचा ताबा मिळाला नाही, त्यामुळे अखेर त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. चौकशीनंतर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात शंभराहून अधिक नागरिकांचे पैसे गुंतले गेले असून त्यांनाही आजतागायत प्लॉट मिळालेला नाही. दरम्यान, या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेल्या पोलीस अंमलदार अशोक पुंड याला अटक होईल का, याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. मात्र पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणात कोणतीही गय न करता कारवाईचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवड यांच्या पथकाने पुंड याला केडगाव परिसरातून अटक केली.
पोलीस अधिक्षकांनी काढले निलंबनाचे आदेश
अशोक पुंड हा जिल्हा पोलीस दलातील अंमलदार असून, त्याची नेमणूक आर्थिक गुन्हे शाखेत होती. मात्र, गुन्ह्याची कुणकुण लागताच ते सुट्टीवर जाऊन गायब झाला होता. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर पोलीस अधीक्षक घार्गे यांनी त्याला खात्यातून तत्काळ निलंबीत केले.
Post a Comment