राहुरी - भरधाव वेगात आलेल्या पिकअपने वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने टाकळीमिया येथील पाच वारकरी जखमी झाले. एक वारकरी गंभीर जखमी झाल्याने त्यास सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारार्थ अहिल्यानगर येथील दवाखान्यात हलवण्यात आले. करकंब ते पंढरपूर रोडवरील अक्षता मंगल कार्यालयाजवळ गुरुवारी (दि.३ जुलै) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
टाकळीमिया येथील श्री दत्त सेवा मंडळाची दिंडी पंढरपूरकडे निघाली आहे. बुधवारी (दि.२ जुलै) करकंब येथे वारकऱ्यांचा मुक्काम होता. दिंडी पंढरपूरकडे रवाना होत असताना गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता दिंडीतील एमएच १७ सीएक्स २५७२ क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली पाठीमागे घेत असताना भरधाव वेगात आलेल्या विना क्रमांकाच्या पिकअपने ट्रॅक्टरला धडक दिली. यात दिलीप अढागळे, सुभाष चौधरी, सुभाष पाचरणे,भाऊराव शेजूळ, देवराम निकम, रा. टाकळीमिया हे जखमी झाले. अपघाताची घटना घडताच स्थानिक गावक-यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात मदतकार्य केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी अहिल्यानगर येथील दवाखान्यात जावुन जखमींची विचारपूस केली. भागवत लक्ष्मण तोडमल, रा. टाकळीमिया यांच्या फिर्यादीवरून अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा नोंदवला आहे.
Post a Comment