नगर तालुक्यात दोन अपघातात दोघांचा मृत्यू


नगर तालुका (प्रतिनिधी) - दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. या प्रकरणी २ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर (ता. नगर) शिवारात एक तर पांगरमल (ता. नगर) बस स्थानकावर दुसरा अपघात झाला आहे.

अक्षय बाबासाहेब सुसे (वय २८, रा. अमरापूर ता. शेवगाव) हा त्याच्याकडील दुचाकीवरून (क्र.एमएच १६ बीआर १२४३) पांढरीपुलाकडे जाणाऱ्या रस्त्याने पुलवाडी, वांबोरी (ता. राहुरी) येथे जात असताना पांगरमल बस स्थानकावर पांढरीपुलाकडून येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या धडकेत अक्षय सुसे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पो चालक सुनील जालव दुड्डु (रा. झारखंड) याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानदेव नामदेव सुसे (वय ५५ रा. अमरापूर) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (२ नोव्हेंबर) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर टोलनाक्याच्या पुढे अंदाजे २०० मीटर अंतरावर झालेल्या अपघातात राजेंद्र तात्याबा गवांदे (वय ४५ रा. शेंडी ता. नगर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.५) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. अधिक तपास पोलीस अमलदार दुधाळ करत आहेत.

0/Post a Comment/Comments