नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील अरणगाव मेहराबाद शिवारातील हराळ वस्तीवर राहणारे सेवानिवृत्त शिक्षक सर्जेराव बाजीराव हराळ (वय ६३) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत २५ हजार रूपयांची रोख रक्कम व सुमारे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत सर्जेराव हराळ यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ एप्रिल रोजी रात्री १०.३० ते १२ एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी सर्जेराव हराळ हे आपल्या राहत्या घरी असताना अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा उघडून घरात प्रवेश केला व कपाटातील १ तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १ तोळ्याचे गंठण, १ तोळ्याची मोहनमाळ,४ ग्रॅम वजनाची नथ व रोख २५ रूपये असा ऐवज चोरून नेला.
सदरचा प्रकार पहाटे चार वाजता लक्षात आल्यानंतर हराळ यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करीत आहेत.
Post a Comment