अहिल्यानगर - ४७ लाखांच्या फसवणूकीचे गुजरात कनेक्शन, सायबर पोलिसांनी ४ भामटे केले गजाआड


अहिल्यानगर - आयसी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए ५ या व्हॉट्सप ग्रुपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची तब्बल ४७ लाख ३ हजार ५४३ रुपयांची फसवणूक करणाऱ्या गुजरात राज्यातील चौघा आरोपींना नगरच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. १९ जून २०२४ ते ११ जुलै २०२४ या कालावधीत फिर्यादी यांना व्हॉट्सप ग्रुपच्या अॅडमिन अनिका शर्मा हिने शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळतो, असे सांगून त्यांच्या विश्वासाला तडा देत फसवणूक केली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी यांनी फसवणूक झालेल्या रकमांचे व्यवहार कोटक महिंद्रा बैंक व एचडीएफसी बँक या बँकांमधून केले होते. सायबर पोलिसांनी संबंधित बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण व केवायसी तपासणी केली असता सदर बँक खाती जावेदभाई सुमारा व जिग्नेश कलसरिया यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले.

तपासादरम्यान हेही स्पष्ट झाले की, महादेव गेडीया व रवी आजगिया या दोघांनी जिग्नेश कलसरिया याला फसवणूक करण्यासाठी बँक खाते उघडण्यास मदत केली होती. सायबर पोलिसांनी याप्रकरणी जावेदभाई मोहम्मदभाई सुमारा (वय ४०, रा. काजली गाव, ता, वेरावल, जि. गिर सोमनाथ, गुजरात), जिग्नेश मोहनभाई कलसरिया (यय २७, रा. सनोसरी, ता. गिरगढडा, जि. गिर सोमनाथ, गुजरात), महादेव जसुभाई गेडीया (वय ३०, रा. शांती विहार सोसायटी, पर्वत पटिया, सुरत, गुजरात) व रवी रामाजीभाई आजगिया (वय ३६, रा. शिवदर्शन सोसायटी. कतार ग्राम, सुरत, गुजरात) यांना अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, उपनिरीक्षक सुदाम काकडे, अंमलदार अभिजीत अरकल, मोहम्मद शेख, अरुण सांगळे, गणेश पाटील, अप्पासाहेब हिंगे, तसेच महिला अंमलदार सविता खताळ याच्या पथकाने केली आहे.

0/Post a Comment/Comments