जयंत पाटलांच्या राजीनाम्याचा मोठा सस्पेन्स; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं...



मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. पवार साहेबांनी मला भरपूर संधी दिल्या, तब्बल सात वर्षे मी या पदावर काम केले. आता नव्या चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे. तुमच्यासमोरच मी साहेबांना विनंती करतो, अशी भावनिक सादही पाटील यांनी घातली होती. त्यानंतर, आता जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवारांकडे दिला असून 15 जुलै रोजी नवीन प्रदेशाध्यक्ष ठरला जाईल, नव्या नावाची घोषणा होईल, असे समजते. मात्र, जयंत पाटलांच्या राजीनाम्याचे वृत्त खोडसाळपणाचे आहे, असे पक्षाचे राष्ट्राय प्रवक्ते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. त्यामुळे, राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला आहे.

जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित नाही, पवार साहेब, सुप्रिया ताई, जयंत पाटील  आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावं चर्चेत आहेत, माझंही नाव चर्चेत आहेत. ज्यावेळेला निर्णय होईल, निवड होईल त्यावेळी निश्चितपणानं काम करू, असं शशिकांत शिंदे म्हणाले. मात्र, जयंत पाटलांच्या राजीनाम्याचे वृत्त आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फेटाळलं आहे.

पक्षात कोणतीही नाराजी नाही

जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. जी माहिती तुम्हाला मिळाली आहे ती मला मिळाली नाही, पक्षाची एक पद्धत असते. पक्षाची बैठक होऊन त्याच्यात निर्णय घेतला जातो असे त्यांनी म्हटले. तसेच, पक्षात कोणतीही नाराजी नाही, शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत, हे तुमच्याकडून मला कळत आहे. पवार साहेब हे विश्वासात घेऊन, बैठक घेऊन असे निर्णय घेत असतात, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
मा. जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे , हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो

राजीनाम्याचे वृत्त खोडसाळपणाचे

जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळलं आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम आहे. विशेष म्हणजे दुसरीकडे रोहित पवारांनी राजीनाम्याचे वृत्त मान्य करत नवीन प्रदेशाध्यक्ष 15 जुलै रोजी जाहीर होईल, ते नाव जयंत पाटील हेच जाहीर करतील, असे म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments