नगर-पुणे महामार्गावर लुटमार करणाऱ्या २ टोळ्यांमधील ७ जण जेरबंद, आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश

अहिल्यानगर - नगर - पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडवून कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या २ टोळ्या पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत. या टोळ्यांमधील ७ जणांना जेरबंद करण्यात आले असून यात ३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तर अजूनही ४ आरोपी फरार आहेत. हे सर्व आरोपी नगर एमआयडीसी जवळील बोल्हेगाव परिसरात राहणारे आहेत. त्यांच्या कडून ३ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

नगर पुणे महामार्गावर नगर तालुका व सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी वाहनचालकांना लुटण्याच्या घटना वाढल्या होत्या. या आरोपींना पकडण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी पोलिस अंमलदार विष्णु भागवत, गणेश लोंढे, भिमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, बाळु खेडकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड व चालक अरुण मोरे तसेच सुपा पोलीस स्टेशनच्या पो. नि.ज्योती गडकरी यांनी उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, पोलीस अंमलदार मेघराज कोल्हे, योगेश सातपुते यांचे पथक नेमले होते.

सदर पथक आरोपींचा शोध घेत असताना पो.नि. कबाडी यांना गोपनीय माहिती मिळाली की,  सदर चा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी यश भाऊसाहेब शिरसाठ (रा.गांधीनगर, बोल्हेगाव) याने त्याच्या साथीदारांसह केला असुन, तो सध्या गांधीनगर बोल्हेगाव येथे त्याचे साथीदारांसह बसलेला आहे. ही माहिती मिळताच त्यांनी तपास पथकाला तात्काळ कारवाई साठी पाठविले. या पथकाने सदर ठिकाणी जावून यश भाऊसाहेब शिरसाठ (वय २०, रा. गांधीनगर, बोल्हेगाव), अथर्व रमेश सुर्यवंशी (वय १९, रा.नवनाथनगर, बोल्हेगाव), साहील अतिफ शेख (वय २१, रा.बोल्हेगाव), विशाल बाबासाहेब पाटोळे (वय २०, रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांच्या सह याच परिसरातील १७ वर्ष वयाची ३ मुले अशा ७ जणांना पकडले.

आरोपी यश भाऊसाहेब शिरसाठ याचे कडे कसून चौकशी केल्यावर त्याने या साथीदारांसह फरार असलेले अदित्य लुकास भोसले (रा.गांधीनगर, बोल्हेगाव), चेतन संतोष सरोदे (रा.गांधीनगर, बोल्हेगाव), नयन दादु पाटोळे (रा. गांधीनगर, बोल्हेगाव), प्रेम राजु नायर (रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांच्या सोबत २२ ऑगस्ट रोजी पहाटे २ आणि २५ ऑगस्ट रोजी पहाटे १ असे ३ लुटमारीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ताब्यातील आरोपींना सुपा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयांचा पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, नगर ग्रामीण चे पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या व सुपा पोलिसांच्या पथकाने केली आहे.

३ दिवसांत केलेले 'हे' ३ गुन्हे आले उघडकीस

या २ टोळ्यांनी २२ ऑगस्ट रोजी पहाटे १ वाजता सुपा गावात शिवरत्न मोटर्स समोर मुरलीधर विठ्ठल गिरी (रा.परळी वैजिनाथ, जि. बीड) या ट्रक चालकाला अडवून लोखंडी सत्तूरचा धाक दाखवत त्याच्या कडील पैसे, मोबाईल व सोन्याचा बदाम असा ३४ हजार १७० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. त्यानंतर पहाटे २ वाजता पवारवाडी घाटात लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या शिवराज वशिष्ट काळे (वय २०, रा. घाटसावळी, जि.बीड) याची हिरो स्प्लेंडर मोटार सायकल व तिला अडकवलेली पिशवी पळवून नेली होती. त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी पहाटे २ च्या सुमारास सुपा टोलनाक्या जवळील म्हसने फाटा येथे रोडचे कडेला उभा असलेल्या ट्रक मधील चालक प्रदीप बिभीषण तिडके (वय ३२, रा.संगम ता. धारूर, जि.बीड, हल्ली रा. चाकण, पुणे) यास कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन त्याचे ताब्यातील मोबाईल फोन, रोख रक्कम असा ५७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लुटला होता. या तिन्ही गुन्ह्यांची कबुली पकडलेल्या आरोपींनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments