संगमनेर (प्रतिनिधी)- शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ
यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी गुरुवारी (दि.२८) रात्री हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या कार्यक्रमात गेले असता अमोल खताळ यांच्याशी हात
मिळवण्यासाठी एक तरुण आला आणि यावेळी त्याने हल्ला केला असल्याचे समजते. मात्र, या
हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या
भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मी
या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. हा हल्ला जो कोणी केला आहे, जे
कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक होते व ते कोणाकडून पुरस्कृत होते याची चौकशी
करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून
महायुतीच्या आमदारांचा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल असे वाटत असेल कोणाला
तर मला वाटते हा त्यांचा गैरसमज आहे आणि तो गैरसमज सुद्धा दूर करायला वेळ लागणार
नाही. शेवटी कायदा हातात घेणे उचित नाही, असे विखे पाटलांनी म्हटले आहे.
लोकशाहीच्या कौलास मान्य केले पाहिजे- विखे पाटील
पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काही
लोकांनी लोकशाहीच्या कौलाल मान्य केले पाहिजे. आता जर त्यांना लोकशाही मान्य नाही, ठोकशाहीच
मान्य असेल तर मला वाटते त्याच पद्धतीने तालुक्यातील कार्यकर्ते उतरतील, असा
इशारा विखे पाटील यांनी दिला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा अप्रत्यक्ष रोख हा कॉंग्रेस
नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर असल्याचे समजते. तसेच गेल्या काही दिवसांपासून
संगमनेरच्या राजकारणात बाळासाहेब थोरात आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये वादाची ठिणगी
पडली आहे. त्यातूनच हा हल्ला झाला असावा का, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संगमनेरमध्ये तणावपूर्ण
परिस्थिती निर्मण झाली आहे. अमोल खताळ यांचे कार्यकर्ते ज्या ठिकाणी कार्यक्रम
होता व जिथे हल्ला झाला त्या मालपानी लॉनच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले आहेत.
अमोल खताळ येथील गणेशोत्सवासाठी आले होते. यावेळी एक तरुण हात मिळवण्याच्या
बहाण्याने आला आणि त्याने हल्ला केला. यावेळी खताळ यांचे जे सुरक्षारक्षक होते
त्यांनी वेळीच त्याला रोखले आणि त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले
आहे.
Post a Comment