अहिल्यानगर - नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समितीचे चिचोंडी पाटील येथे ३० ऑगस्ट रोजी होणारे भूमिपूजन सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती आमदार शिवाजीराव कर्डिले व बाजार समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार असल्याच्या दृष्टीने चिचोंडी पाटील येथे उपबाजार समितीची स्थापना करण्याचा निर्णय बाजार समितीच्या वतीने घेण्यात आला होता. उपबाजार समितीचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ३० ऑगस्ट रोजी करण्यात येणार होते. परंतु त्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा असल्याने यावेळी पणनमंत्री जयकुमार रावल व पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह बहुतांशी मंत्री शहा यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महत्त्वांच्या विषयावर चर्चा होणार आहे. तसेच पक्ष संघटना व आगामी निवडणुकींबाबत ही चर्चा करण्यात येणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असल्याने सर्वच नेते शहा यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे चिचोंडी उप बाजार समितीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. ३० ऑगस्ट रोजी होणारा भूमिपूजनाचा कार्यक्रम सप्टेंबर महिन्यात होणार असुन सर्वांशी चर्चा करून तारीख ठरविण्यात येणार असल्याची माहिती आमदार कर्डिले व बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
Post a Comment