दुध कांडी पशुखाद्याची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची लाखोंची फसवणूक


अहिल्यानगर - दुध कांडी पशुखाद्याची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने नगरजवळील धनगरवाडी येथील शेतकऱ्याची पुण्यातील दोघांनी ३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोपट भिवसेन शिकारे (वय ४५, रा. धनगरवाडी, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिकारे यांची २०२३ मध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून विलास आनंदा कासुर्डे व स्वप्निल मोरे (रा. स्वारगेट, पुणे) यांनी शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांसाठी दुध कांडी हे पशुखाद्य तयार केलेले असून त्याची डिलरशीप ते देत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे शिकारे यांनी या दोघांचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी डिलरशीप देण्याचे आश्वासन देत त्यासाठी शिकारे यांच्याकडे ३ लाख रुपयांची मागणी केली. शिकारे यांनी त्यांना ३ लाख रुपये दिले.

त्यानंतर अनेकदा त्यांना डिलरशीप बाबत संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर त्यांचे फोन घेणेही टाळू लागले. त्यामुळे शिकारे हे आरोपींच्या पुणे येथील कार्यालयात गेले असता त्यांचे कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे शिकारे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी २९ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी विलास आनंदा कासुर्डे व स्वप्निल मोरे या दोघांच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१८ (), () प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments