अहिल्यानगर - नगरमधील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय युवकावर त्याच्याच वर्गातील युवकांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी दुपारी १.१५ ते १.३० च्या सुमारास घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. युवराज अशोक खाडे (रा. शास्त्रीनगर, केडगाव) असे जखमी युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धार्थनगर मधील एका युवकासह त्याच्या अनोळखी साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जखमी युवराजचे वडील अशोक ध्यानु खाडे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवराज हा त्या महाविद्यालयात एसवायबीए चे शिक्षण घेत आहे. तो २९ ऑगस्ट रोजी दुपारी महाविद्यालयाच्या आवारातून चाललेला असताना त्यास त्याच्याच वर्गातील एका युवकाने व त्याच्या साथीदारांनी अडवले, आमच्याकडे वाकड्या नजरेने का पाहतो असे म्हणत त्यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच एकाने त्याला खाली पाडून त्याच्या छातीवर बसत त्याचा गळा आवळला. तसेच हातातील धातूच्या कड्याने गळ्यावर व मानेवर जबर मारहाण केली. त्यामुळे त्याच्या गळ्याला आणि मानेच्या मणक्याला गंभीर इजा झाली.
या मारहाणीनंतर सर्व युवक तेथून पसार झाले. काही युवकांनी जखमी युवराज यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. काही वेळाने त्याच्या वडिलांनी आणि भावाने महाविद्यालयात जावून इतर विद्यार्थ्यांकडून माहिती घेतल्यावर त्यांना सिद्धार्थनगर मध्ये राहणारा आणि युवराज याच्याच वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे नाव समजले.
त्यामुळे त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात त्याच्या व इतर मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सिद्धार्थनगर मधील युवकासह त्याच्या साथीदारांच्या विरुद्ध बीएनएस कलम १०९, ११५ (२), ३ (५) प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment