अहिल्यानगर - मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खा. निलेश लंके हे मुंबईत पोहोचले असून सरकार दहा मिनिटात निर्णय घेऊ शकते, सरकारने वेळकाढूपणा न करता हा निर्णय घ्यावा अशी भूमिका खा. लंके यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.
खा. लंके म्हणाले, मराठा आरक्षणाचा हा लढा अनेक वर्षांपासूनचा आहे. या लढयाला यश आले पाहिजे ही भावना माझी नव्हे तर महाराष्ट्रातील असंख्य लोकांची आहे. या आंदोलनात मुंबईतील फ्री वे वरून खा. लंके हे पायी चालले होते. त्याविषयी माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी पायी चाललो काय किंवा वाहनात बसून चाललो काय याला अर्थ राहत नाही. या जनतेसोबत चालण्यात जो आनंद तो दुसरा कशामध्ये नाही. मी सरकारला सांगू इच्छितो की, आता कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे, एक घाव दोन तुकडे केले पाहिजेत.
आरक्षणाचे हे घोंगडे किती दिवस भिजत ठेवणार आहात ?
सरकारने आता निर्णय घेतला पाहिजे. निर्णय घेणे ही कुठलीही अवघड गोष्ट नाही. अगदी दहा मिनिटात सरकार निर्णय घेऊ शकते. अवघड काही नाही. मात्र ज्या स्त्रीला नांदायचे नाही तिला सतरा पळवाटा असतात, अशी या सरकारची गंमत आहे. कोर्ट, कचेरी या भानगडी काही नको. निर्णय लगेच घ्यायला हवा असे खा. लंके यांनी ठामपणे सांगितले.
आज मुंबईत पहावे तिकडे मराठा आंदोलक दिसत आहेत. या गर्दीने आज पर्यंतचे अनेक विक्रम मोडले आहेत. जनतेचा कौल, जनतेचा रेटा पाहून सरकारने निर्णय घेतला पाहिजे. गणेश उत्सव हा पवित्र उत्सव आहे. मी गणरायाला प्रार्थना करतो की सरकारला सद्बुध्दी द्यावी आणि जरांगे पाटलांच्या या लढयाला यश यावे असे खा. लंके म्हणाले.
Post a Comment