रात्रीच्या प्रवासासाठी नगर-पुणे महामार्ग बनलाय धोकादायक, पुन्हा एका ट्रकचालकाला सत्तूरचा धाक दाखवत लुटले

 


सुपा - नगर-पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना कोयत्याचा, सत्तूरचा धाक दाखवून लुटमार करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून २५ ऑगस्ट रोजी पहाटे पुन्हा एका ट्रकचालकाला २ मोटारसायकल वर आलेल्या ५ जणांनी लोखंडी सत्तूरचा धाक दाखवून लुटल्याची घटना सुपा टोलनाक्याच्या पुढे म्हसणे फाटा येथे घडली आहे. या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रदीप बिभीषण तिडके (वय ३२, रा.संगम ता. धारूर, जि.बीड, हल्ली रा. चाकण, पुणे) यांनी सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांचा मालट्रक (क्र.एम एच ४३ बी पी ०९६६) घेवून पुण्याहून छत्रपती संभाजीनगर कडे जात होते. २५ ऑगस्ट रोजी पहाटे २.३० च्या सुमारास ते म्हसणे फाट्याजवळ आले असता त्या ठिकाणी असलेल्या हॉटेल समोर २ मोटारसायकल वर ५ जण आले. 

त्यांनी मोटारसायकली ट्रक ला आडव्या लावून ट्रक थांबविला. त्यानंतर चालक तिडके यांना लोखंडी सत्तूरचा धाक दाखवत त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यांच्या फोन पे चा पासवर्ड विचारून त्यांच्या खात्यात असलेले ४५ हजार रुपये एक क्यु आर कोड स्कॅन करून त्यावर ट्रान्सफर केले. नंतर त्यांच्या कडील मोबाईल, चांदीचे ब्रासलेट असा ५७ हजार ८०० रुपयांचा ऐवज घेवून तेथून पसार झाले.

यानंतर ट्रक चालक तिडके हे सुपा टोलनाक्यावर गेले, तेथील कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. तेथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तेथे येवून घटनास्थळी भेट दिली तसेच लुटारूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना लुटारूंचा काहीही तपास लागला नाही. याबाबत तिडके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात ५ जणांच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१० (२) प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे हे करत आहेत.

महिनाभरातील लुटीची ५ वी घटना

नगर पुणे महामार्गावर सुपा व नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लुटीची ही ५ वी घटना आहे. यापूर्वी २८ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास कार मधून प्रवास करणाऱ्या बहिण भावाला लुटल्याची घटना नारायणगव्हाण (ता. पारनेर) शिवारात घडली होती. तर ३-४ दिवसांपूर्वी पवारवाडी घाटात लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाची स्प्लेंडर मोटारसायकल दोघांनी पळवून नेली होती. नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत चास घाटात लुटमारीच्या २ घटना घडल्या होत्या. 

मात्र तालुका पोलिसांनी या मार्गावर रात्रीची गस्त वाढवून दरोड्याच्या तयारीत असलेली एक टोळी पकडली होती. मात्र सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या लुटमारीच्या घटनांचा सुपा पोलिसांना अद्याप काहीही तपास लागलेला नाही. गेल्या वर्षभरात या महामार्गावर अशा प्रकारे लुटमार करण्याच्या अनेक घटना घडल्या असून पोलिसांना मात्र या लुटारूंना पकडण्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे हा महामार्ग रात्रीच्या वेळी प्रवासासाठी धोकादायक ठरू लागला आहे.

0/Post a Comment/Comments