मुंबई - एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटांनी अनेक विक्रम मोडले आणि नवे रचलेसुद्धा. केवळ भारतातच नाही तर जगभरात या चित्रपटांना भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता माहिष्मती साम्राज्याची गोष्ट प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. निर्मात्यांनी ‘बाहुबली : द एपिक’ या नावाने एक नवीन पोस्टर प्रदर्शित केला आहे. यामध्ये अभिनेता प्रभास आणि राणा डग्गुबत्ती दिसत आहेत. हा पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट कधी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार, याचीही घोषणा निर्मात्यांनी केली आहे.
2015 मध्ये ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि त्याच्या दोन वर्षांनंतर 2017 मध्ये ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता ‘बाहुबली : द एपिक’ या चित्रपटाची घोषणा करून निर्मात्यांनी पुन्हा चर्चा घडवून आणली आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा केवळ एक चित्रपट नाही तर सिनेमॅटिक स्पेक्टॅकल असेल, ज्याला डॉल्बी अटमॉस साऊंड आणि हाय-एंड व्हिज्युअल इफेक्ट्ससह जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. या पोस्टरवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
‘बाहुबली : द एपिक’ हा फ्रँचाइजीमधला तिसरा चित्रपट आहे का, त्यात नवी कथा दाखवण्यात येणार आहे का, असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. परंतु यामध्ये एक ट्विस्ट आहे. हा ट्विस्ट असा आहे की ‘बाहुबली’ला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दोन्ही भाग एकत्र थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट सलग पाच तास थिएटरमध्ये दाखवले जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक वेगळा आणि अनोखा अनुभव असेल. सध्या जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. यानिमित्ताने कमाईसुद्धा चांगली होते आणि प्रेक्षकांनाही त्यांचे आवडते चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर पहायला मिळतात.
‘बाहुबली : द एपिक’चा पोस्टर प्रदर्शित होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत उत्साह व्यक्त केला. ‘ओह माय गॉड, आम्ही याचीच प्रतीक्षा करत होतो’, असं एकाने म्हटलंय. तर ‘आणखी 100 कोटींची कमाई होणार आहे’, असं दुसऱ्याने लिहिलंय. ‘आम्हाला यात डिलिट केलेले सीन्ससुद्धा पहायचे आहेत’, अशीही इच्छा काहींनी बोलून दाखवली.
Post a Comment