मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय


मुंबई: मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाकडून मनाई करण्यात आली आहे. नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असेल, असे मुंबई हायकोर्टाचे एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान निर्देश दिले आहेत. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांची डोकेदुखी वाढली असून ते पुढे काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सव काळात मुंबईत उपोषणाला येणं टाळावं, अशी विनंती करण्यासाठी २६ ऑगस्ट रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे हे अंतरवाली सराटी इथं दाखल झाले होते. राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत याबाबत चर्चाही केली. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका या भेटीनंतर जरांगेंनी मांडली. आम्ही मुंबईला निघण्याआधी सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, तरंच आम्ही माघार घेऊ, असं जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. परंतु आता हायकोर्टानेच मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केल्याने मनोज जरांगेंची कोंडी होणार आहे.

आम्हाला आझाद मैदान का नाही ? जरांगे पाटील

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानाच्या आंदोलनावर ठाम आहे. आमचेही वकील न्यायालयात जातील, असं ते म्हणाले आहेत. आम्हाला आझाद मैदान का नाही? असं म्हणत त्यांनी २७ ऑगस्टला मुंबईला निघण्याचं जाहीर केलं आहे. आम्ही न्याय मागण्यासाठी आमरण उपोषण करणार आहोत, असं जरांगे म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या विरोधात आणि माझ्याविरोधात षड्यंत्र करीत आहेत, आम्हाला आझाद मैदान का मिळणार नाही? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. हायकोर्टाने आझाद मैदानावरील आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

राज्य सरकारची भूमिका

शांततापूर्ण आंदोलन करण्याचा नागरिकांना अधिकार आहे. मात्र शहर ठप्प होईल, अशा पद्धतीने आंदोलन करता कामा नये. गणेशोत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचा पोलिसांवर मोठा ताण असून मोठ्या संख्येत जमाव आल्यास पोलिसांवरील ताण वाढेल, तसेच मोठी गैरसोय होईल, अशी भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठामच आहेत.

0/Post a Comment/Comments