मुंबईत मराठा आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न, पाणपोया व स्वच्छतागृह केली बंद
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा बांधव राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत जमलेत. पण आता त्यांना सरकारकडून करण्यात येणाऱ्या कथित गळचेपीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर मुंबई शहरातील पाणपोया व स्वच्छतागृह बंद केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर मनोज जरांगे यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. या प्रकरणी सर्वांचा हिशोब होईल. फक्त बीएमसीचा आयुक्त कोण आहे? त्याचे नाव लिहून ठेवा, असे ते म्हणालेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. पण अजूनही त्यावर तोडगा निघाला नाही. त्यातच सरकारकडून कथितपणे आंदोलकांसाठी पायाभूत सुविधा पुरवल्या जात नसल्यामुळे स्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सरकारवर पाणपोया व स्वच्छतागृह बंद केल्याचा आरोप केला आहे.
मुंबई शहरातील पाणपोया बंद
रोहित पवार शनिवारी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजत आहे. खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत. शांतेतेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला की काय?
सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही. सरकारने त्वरित मूलभूत सुविधा द्याव्यात आणि आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा. संवाद ठेवल्यास संवेदनशीलता आणि सामंजस्य दाखवण्यास आंदोलक देखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल, असे ते म्हणाले.
Post a Comment