फक्त ४०० रुपये गुंतवणूक करा; ७० लाख जमा होतील, पोस्ट ऑफिसची 'ही' भन्नाट योजना



मुंबई - पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय विश्वासार्ह पर्याय ठरत आहेत. सुरक्षित परतावा आणि करसवलतीचा लाभ मिळवायचा असेल, तर सुकन्या समृद्धी योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. मुलीच्या नावावर चालवल्या जाणाऱ्या या योजनेत सध्या तब्बल 8.2 टक्के व्याजदर लागू आहे आणि ही संपूर्ण योजना टॅक्स फ्री आहे.

काय आहे सुकन्या समृद्धी योजना?

भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी सुरू केलेली ही योजना पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडता येते. तुम्ही 10 वर्षांखालील मुलीच्या नावाने अकाऊंट सुरू करू शकता. एका कुटुंबात दोन मुलींसाठी आणि जुळ्या मुली असल्यास तीन अकाऊंटपर्यंत ही सुविधा उपलब्ध आहे.

या खात्यात दरवर्षी किमान 250 आणि कमाल 1.5 लाख गुंतवता येतात. डिपॉझिटची मुदत 15 वर्षांपर्यंत असते, मात्र खातं 21 वर्षांनंतरच परिपक्व (मॅच्युअर) होतं. म्हणजेच, गुंतवणूक थांबवून देखील तुम्हाला पुढील 6 वर्षांपर्यंत व्याज मिळत राहतं.

पैसे कधी आणि कसे काढता येतील?

मुलगी 18 वर्षांची झाल्यावर, किंवा तिचं 10वीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर या खात्यातून पैसे काढता येतात. मात्र, दरवर्षी एकदाच पैसे काढता येतात आणि ते देखील एकूण शिल्लक रकमेच्या 50% पर्यंत. पूर्ण रक्कम काढण्यासाठी 21 वर्षांचा कालावधी पूर्ण करावा लागतो, किंवा मुलीच्या लग्नावेळी (किमान वय 18)ही पूर्ण रक्कम मिळू शकते.

जर तुम्ही दररोज फक्त 400 वाचवून सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली, तर महिन्याला 12,500 आणि वर्षाला 1.5 लाख इतके डिपॉझिट होतो. मुलगी 5 वर्षांची असताना तुम्ही गुंतवणूक सुरू केली, आणि 15 वर्षांपर्यंत दरवर्षी ₹1.5 लाख जमा करत राहिलात, तर 21 व्या वर्षी तिच्या नावावर तब्बल 69,27,578 इतकी रक्कम जमा होईल.

या रकमेपैकी 22.5 लाख गुंतवणूक, आणि 46.77 लाख फक्त व्याज असेल. ही योजना तुमच्या मुलीचं शिक्षण, करिअर, लग्न किंवा स्टार्टअपसाठी आर्थिक बळ देऊ शकते – तेही कुठलाही जोखीम (Risk) न घेता.

0/Post a Comment/Comments