मुंबई - उत्तराखंडच्या धराली येथील ढगफुटीनंतर महाराष्ट्रातील तब्बल 34 पर्यटकांशी संपर्क होत नसल्याची बाब पुढे आली आहे. यात पुणे जिल्ह्यातील 19 व जळगावच्या धरणगाव तालुक्यातील 15 पर्यटकांचा समावेश आहे. प्रशासनातर्फे सध्या या पर्यटकांशी संपर्क साधण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न केला जात आहे.
उत्तराखंडच्या धराली गावात मंगळवारी भयंकर ढगफुटी झाली होती. त्यानंतर नदीला आलेल्या पुरात अख्खे गावच भूईसपाट झाले होते. या घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 50 हून अधिक जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यातच महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, जळगाव, नांदेड आदी जिल्ह्यांतील अनेक पर्यटक उत्तराखंडच्या पर्यटनासाठी गेले होते. यापैकी 34 पर्यटकांशी संपर्क होत नसल्यामुळे काळजी वाढली आहे.
अवसरीच्या 19 जणांचा शोध सुरू
यासंबंधीच्या वृत्तानुसार, आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 1990 च्या 10 वीच्या बॅचमधील 8 पुरुष व 11 महिलांचा एक समूह पर्यटनासाठी 1 ऑगस्ट रोजी उत्तराखंडला रवाना झाला होता. या सर्वांचा गंगोत्री परिसरातून शेवटचा संपर्क झाला होता. काल सकाळी या समुहातील काही जणांनी गंगोत्री येथील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मंगळवारी दुपारी धराली येथे ढगफुटी झाली तेव्हा हा समूह त्याच भागात होता. या समुहातील एका महिलेने आपल्या मुलाशी फोन करून आपण सर्वजण सुखरूप असल्याचे कळवले होते. पण त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही.
धरणगावच्या 15 भाविकांशी संपर्क तुटला
जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील 15 भाविकांचा एक समूह उत्तराखंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यांचे नातलग कालपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती आहे.
51 पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती
दुसरीकडे, राज्य आपत्कालीन कार्यालयाने महाराष्ट्रातील 51 पर्यटक उत्तराखंडमध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. यात नांदेड जिल्ह्यातील 11, सोलापूरच्या 4 व इतर जिल्ह्यातील 36 पर्यटकांचा समावेश आहे. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर असून पर्यटकांची संपर्क करत आहे. त्यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधला जात आहे. या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : 9321587143 / 022-22027990 / 022-22794229
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : 0135-2710334 / 821
Post a Comment