अहिल्यानगर
- केडगाव येथील तरूणाने पत्नी व सासरच्या मंडळींच्या मानसिक
छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहन बाबासाहेब
कराड (वय 26) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी मृताचे
वडिल बाबासाहेब विक्रम कराड (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांविरूध्द आत्महत्या
करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
महादेव दशरथ पाखरे, दिलीप सुर्यभान खेडकर (दोघे रा. मढी, ता. पाथर्डी), विद्या रोहन कराड (रा. चुंभळी, ता. पाथर्डी) अजिनाथ महादेव पाखरे (रा. मढी, हल्ली रा. राहुरी), राजु ऊर्फ राजेंद्र मुरलीधर दहिफळे, नीलेश राजेंद्र दहिफळे (सर्व रा. चुंभळी), श्रीधर कारभारी बुधवंत (रा. शिरापुर, ता. पाथर्डी), सुभाष सुखदेव पालवे (रा. देवराई, ता. पाथर्डी) व मनिषा राजेंद्र दहिफळे (रा. चुंभळी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
रोहन कराड यांचा विवाह जुलै 2024 मध्ये पाथर्डी तालुक्यातील चुंभळी येथील विद्या दहिफळे
हिच्यासोबत झाला होता. लग्नापूर्वी व नंतर सातत्याने सासरकडून विविध कारणांनी
त्रास दिला जात असल्याची तक्रार फिर्यादीत करण्यात आली आहे. विवाहानंतर काही काळ
सुरळीत संसार झाल्यानंतर विद्या हिने पती रोहन याच्यासोबत भांडणे सुरू केली व
माहेरी जाऊन परत आली नाही. याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला असता रोहन व त्याच्या
कुटुंबीयांना सासरच्यांकडून शिवीगाळ, धमक्या व अपमान सहन करावा लागला.
सततच्या
या मानसिक छळामुळे व पत्नी नांदायला येत नसल्यामुळे रोहन कराड प्रचंड तणावाखाली
राहू लागला. अखेर 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी त्याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली
असल्याची घटना उघडकीस आली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून नऊ
जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक
पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करीत आहेत.
आत्महत्येपूर्वी ठेवले स्टेटस
आत्महत्येपूर्वी रोहन कराडने आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप स्टेटस
ठेवून आत्महत्येस जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे स्पष्ट केली होती. बायकोचा
त्रास आणि सासरच्यांच्या छळामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे
नमूद करत महादेव पाखरे, अजिनाथ पाखरे, दिलीप
खेडकर, विद्या कराड, राजेंद्र दहिफळे,
नीलेश दहिफळे, मनिषा दहिफळे, श्रीधर बुधवंत व सुभाष पालवे यांच्याविरूध्द स्पष्ट उल्लेख केला होता.

Post a Comment