मोठी बातमी: इराण उद्ध्वस्त, आम्ही युद्ध जिंकलो; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा



वॉशिंग्टन - गेल्या 13 दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून वारंवार हल्ले करण्यात येत आहे. तर इराणकडून पलटवार सुरु आहे. याचदरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज इराणविरोधातील युद्ध जिंकल्याचा मोठा दावा केला आहे.

इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरलं नाही. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. अमेरिकेनं इराणविरुद्धचं युद्ध जिंकलंय, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. इराणचे सर्व महत्वाचे नेते मारल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच इराणच्या 58 जहाजांना समुद्राच्या बुडाला नेले, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

इराणने अमेरिकेला मोठी धमकी दिली आहे. तेलाच्या किमती प्रति बॅरल 200 डॉलर्सपर्यंत पोहोचतील याची तयारी ठेवावी, इराणने म्हटलं आहे.   आम्ही अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांपर्यंत एक लिटरही तेल पोहोचू देणार नाही. त्यांच्याकडे जाणारे कोणतेही जहाज किंवा टँकर आमचे कायदेशीर लक्ष्य असेल, असा इशारा इराणने दिला आहे. तेलाच्या किमती प्रति बॅरल 200 डॉलर्सपर्यंत पोहोचतील याची तयारी ठेवा कारण तेलाची किंमत तुम्ही अस्थिर केली आहे, असंही इराणने म्हटलं आहे.

2025 मध्ये इराण-इस्त्रायल युद्ध आणि इराण समर्थित गटांशी झालेल्या संघर्षांमुळे इस्त्रायच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये इराणला वारंवार इशारा दिला होता की, ते त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांचा अनियंत्रित विस्तार करू देणार नाहीत. परंतु, इराणने अशा कोणत्याही गोष्टींना जुमानले नाही. इराणने आपला संवेदनशील अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र संबंधित प्रक्रिया सुरूच ठेवल्या. अनेकदा इशारे देऊनही इराण थांबत नाही, असे दिसताच इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला चढवला, ज्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता भारताच्या बाजारपेठेत उमटू लागले आहेत. या युद्धाचा फटका केवळ इंधनालाचं नाही, तर आता चक्क पिण्याच्या पाण्यालाही बसला आहे. पाण्याची बॉटल बनविण्याचा कच्चा माल विदेशातून येतो. आणि या युद्धामुळे येणारा कच्चा माल रखडल्यानं बाटलीबंद पाण्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, 20 रुपयांची पाणी बॉटल आता 30 ते 40 रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. बिस्लेरी, किन्ले, एक्वाफिना, हिमालयन, बेली, टाटा कॉपर वॉटर, किंगफिशर, नेस्ले प्युअर लाईफ यांसारख्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ब्रँड्सला या युद्धाचा काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वितरकांकडून वर्तविण्यात येतं आहे. मात्र, याचा मोठा परिणाम थेट छोट्या व्यावसायिकांवर पडतोय. 



0/Post a Comment/Comments