तरुणीवरील अत्याचारातून जन्मलेल्या नवजात अर्भकाला रस्त्यावर फेकले, पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या



अहिल्यानगर: नगर तालुक्यातील बाराबाभळी बायपास परिसरात काही दिवसांपूर्वी एका बाभळीच्या झाडाखाली नवजात अर्भकाला फेकून देणाऱ्या ३ आरोपींना भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडले आहे. पीडित तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचे व जन्माला आलेले नवजात बालक बेवारस अवस्थेत फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास बाराबाभळी शिवारातील बायपास रस्त्यालगत एका बाभळीच्या झाडाखाली अंदाजे १ ते २ दिवसांचे नवजात पुरुष जातीचे अर्भक बेवारस अवस्थेत आढळून आले होते. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६४(२)(एम), ३(५) अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेचा तातडीने सखोल तपास सुरू केला असता, पीडित तरुणीवर आरोपीने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. तसेच नवजात बालकाला रस्त्याच्या कडेला फेकून देण्याच्या या गुन्ह्यात अन्य लोकांचाही सहभाग असल्याचे समोर आले.

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत  किरण विश्वनाथ वाघमारे (वय २४), वैशाली राजेंद्र भिंगारदिवे (वय ३६) आणि  इरफान मिकन शेख (वय ५१) या तीन आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान मुख्य आरोपी किरण वाघमारे याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पीडित तरुणी व नवजात बालकाचे डीएनए नमुने घेऊन पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच नवजात बालकाला रस्त्याच्या कडेला नेऊन टाकण्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

गुन्ह्यातील इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या स.पो.नि. तेजश्री थोरात, पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार, सुहास आव्हाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी टकले, दिलीप शिंदे, कैलास सायंबर, रेखा पुंड, रामनाथ डोळे, प्रमोद लहारे, कांतीलाल चव्हाण, सतीश भांड तसेच दक्षिण मोबाईल सेलचे अरुण सांगळे यांच्या पथकाने केली आहे.

0/Post a Comment/Comments