नगर तालुक्यात २८ जुलैला रंगणार बैलगाडा (छकडी) शर्यतीचा थरार, विजेत्यांवर होणार बक्षिसांचा वर्षाव



नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यात सलग चौथ्या वर्षी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार असून, मंगळवारी  (दि. २८ जुलै) भोरवाडी येथे नगर तालुका केसरी बैलगाडा (छकडी)शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या शर्यतीमध्ये विजेत्यांवर मोटारसायकल,इलेक्ट्रीक स्कुटी या वस्तूंसह रोख अशा लाखो रुपयांच्या बक्षीसांचा धुरळा उडणार आहे. न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्याने आता राज्यात व देशभरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. मात्र, नगर तालुक्यात सलग चौथ्या वर्षापासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन भोरवाडी येथील श्री. हनुमान सप्ताह यात्रा उत्सवानिमित्त राहुल जाधव युवा मंचच्या वतीने करण्यात येत आहे. मंगळवारी  (दि. २८ जुलै) सकाळी ९ वाजेपासून बैलगाडा शर्यत सुरू होणार आहे. बैलगाडा शर्यतीत राज्यभरातील गाडा चालक भाग घेणार आहेत. दिवसभर चित्तथरारक शर्यतींचा थरार नागरिकांना पाहण्यास मिळणार आहे.

बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यापासून नियम-अटींची पूर्तता करीत या शर्यती पार पडल्या जात आहेत. राज्यात ठिकठिकाणी शर्यतीच्या आयोजनामुळे ग्रामीण अर्थकारणावर अनुकूल परिणाम झाला आहे. शर्यतीच्या ठिकाणी लाखोंची उलाढाल होणार आहे तर बैलजोडीला पुन्हा महत्व प्राप्त होत आहे. खिलार बैलजोडीच्या किंमती या लाखोंच्या घरात गेल्या आहेत. अशातच नगर तालुक्यात भोरवाडी येथे आयोजित केल्या जाणाऱ्या या बैलगाडा शर्यतीबाबत मोठी उत्सुकता आहे. अधिक माहितीसाठी राहुल जाधव युवा मंचचे विजय लोमटे (मो. ९७३०५१४१४१), अक्षय पानसरे (मो.७२७६७७६९७६) स्वप्नील वाळूंज (मो.९१४५४०१०१७), प्रतिक भोर (मो.९०२८२३०७०७), संदीप दांगट (मो. ९८८११६९३९६), शिवाजी दारकुंडे (मो. ९९२१८६०१९८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 

0/Post a Comment/Comments