भारतीय महिला संघाची दमदार कामगिरी; बांगलादेशचा ११४ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक



नवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी (२० सप्टेंबर) पार पडलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Womens Team) बांगलादेशचा (Bangladesh) ११४ धावांनी धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे भारतीय संघाचे सुवर्णपदक निश्चित मानले जात असून, आता सुवर्णपदकासाठी भारत विरुद्ध श्रीलंका अशी लढत रंगणार आहे. तर कांस्यपदकासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश आमनेसामने असतील.

भारताच्या या दणदणीत विजयात सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) मोलाचे योगदान दिले. तिने ४९ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०० धावांची तडाखेबंद खेळी केली. या शतकासोबतच शेफालीने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक ठोकण्याचा पहिला मान शेफाली वर्माने पटकावला असून, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील हे तिचे पहिलेच शतक ठरले. या खेळी दरम्यान तिने टी-२० क्रिकेटमध्ये आपले १०० षटकारही पूर्ण केले.शेफालीने २०२६ या एकाच कॅलेंडर वर्षात ८ वेळा अर्धशतक पूर्ण करत उपकर्णधार स्मृती मानधनाच्या (२०२४ मधील ८ अर्धशतके) खास विक्रमाशी बरोबरी साधली.

उपकर्णधार स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) अवघ्या १५ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३७ धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीसोबतच स्मृतीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४,७८८ धावा पूर्ण करत जगात अव्वल स्थान पटकावले आहे. तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्स (४,७५८ धावा) हिला मागे टाकून हे स्थान मिळवले. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही ४० धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. बांगलादेशकडून रुबेया खान, नाहिदा अख्तर आणि मारूफा अख्तर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

भारताने दिलेल्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १५.४ षटकांत अवघ्या ८१ धावांवर तंबूत परतला. बांगलादेशकडून दिलारा अख्तर (२७), सुलताना खाटून (१२) आणि शर्मीन अख्तर (१०) वगळता इतर सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. भारताकडून नंदिनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले, तर श्री चरणीने २ बळी घेतले.

भारतीय संघाची ऐतिहासिक आकडेवारी

भारतीय महिला संघाने २०२३ ते २०२६ या कालावधीत बांगलादेशविरुद्धचा आपला १० वा विजय नोंदवला.धावांच्या फरकाने भारताचा हा टी-२० क्रिकेटमधील तिसरा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी २०१८ मध्ये मलेशियाविरुद्ध १४२ धावांनी, तर २०२६ च्या आशिया चषकात हाँगकाँगविरुद्ध १२६ धावांनी विजय मिळवला होता.

0/Post a Comment/Comments