अहिल्यानगर
- अहिल्यानगर येथे नव्याने मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १००
विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रवेश पूर्ण होऊन महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू
झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी महाविद्यालयाला भेट देऊन
विद्यार्थी, अधिष्ठाता, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय सुरू व्हावे, ही अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण
झाल्याने मनस्वी आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लोकसभा
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील नागरिकांनी शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाची मागणी केली होती. त्यावेळी खासदार झाल्यानंतर जिल्ह्यात वैद्यकीय
महाविद्यालय आणण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार खासदार झाल्यानंतर या
महाविद्यालयासाठी पाठपुरावा केला. खासदार सुप्रिया सुळे यांनीही यासाठी सहकार्य
केले. त्यातून महाविद्यालयाला मंजुरी मिळाली असून, आता पहिल्या तुकडीतील १०० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याचे पाहून समाधान
वाटत असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे
अधिष्ठाता डॉ. लांब यांना विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील कामाचा अनुभव असून, त्यांनी नव्या संस्थेचे आव्हान स्वीकारले
आहे. त्यांच्यासह प्राध्यापक आणि कर्मचारीवर्ग महाविद्यालयाच्या कामकाजासाठी
कार्यरत आहे. या वेळी खासदार लंके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोटा येथील
एक विद्यार्थी अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी दाखल झाल्याचे समजल्यावर
त्यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या भागातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर
जात असताना अन्य भागांतील विद्यार्थी अहिल्यानगरमध्ये शिक्षणासाठी येणे ही
अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
महाविद्यालयाच्या
मंजुरीच्या प्रक्रियेत कोणी प्रयत्न केले किंवा कोणी विरोध केला, यावर आता चर्चा करण्यापेक्षा संस्थेच्या
प्रगतीला प्राधान्य दिले पाहिजे. ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे, तसेच विरोध करणाऱ्यांचेही आभार मानून आता पुढे जाण्याची गरज आहे.
महाविद्यालय सुरू झाले असून विद्यार्थ्यांचे प्रवेशही झाले आहेत. त्यामुळे जुन्या
वादांमध्ये न अडकता संस्थेच्या विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत खासदार लंके यांनी व्यक्त केले.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णांना मोठा लाभ होण्याची
अपेक्षा आहे. वैद्यकीय शिक्षणासोबतच रुग्णसेवेला बळ मिळणार असून, अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयाचा दर्जा
उंचावण्यास मदत होईल. आजवर अनेक रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून किंवा
मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवावे लागत होते. मात्र, स्थानिक
पातळीवर वैद्यकीय सुविधा विकसित झाल्याने रुग्णांना जिल्ह्यातच अधिक चांगले उपचार
मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासगी
संस्थांचा विस्तार करण्याबरोबरच शासकीय संस्थाही सक्षम आणि दर्जेदार झाल्या
पाहिजेत. सर्वसामान्य नागरिकांना चांगले उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय
आरोग्यव्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे. अहिल्यानगरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
हे वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असल्याचे खासदार
नीलेश लंके यांनी सांगितले.

Post a Comment