घोसपुरी येथील श्री क्षेत्र पद्मावती देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन


अहिल्यानगर - नगर तालुक्यातील घोसपुरी येथील प्रसिद्ध काच मंदिर असलेल्या श्री क्षेत्र पद्मावती देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा होत असून, यानिमित्ताने देवीच्या दरबारात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि लोककलेच्या कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात जय्यत तयारी करण्यात आली असून भाविकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबर रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत घोसपुरी व पंचक्रोशीतील आराधी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० ते ११वाजेपर्यंत जि.प. प्राथमिक शाळा घोडके वाडी, मोळ वस्ती, कवडे वाडी, हंडोरे मळा व खोबरे वस्ती यांच्या सहभागातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता झी टॉकीज फेम ह.भ.प. भारतरत्न कृष्णा महाराज जोगदंड (कामखेडा, लातूर) यांच्या सुश्राव्य व प्रबोधनपर भारुड कार्यक्रमाचा लाभ भाविकांना घेता येणार असून, त्यानंतर  सुधाकर मधुकर सरोदे आणि पार्टीतर्फे देवीचा गोंधळ सादर केला जाईल.

१४ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० ते ११ वाजेपर्यंत जि.प. प्राथमिक शाळा घोसपुरीच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता 'मराठी फोल्क' या लोककलेतून समाज प्रबोधन करणारा कार्यक्रम सादर केला जाईल. १६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० ते ११ वाजेपर्यंत संगमनेरच्या 'हिंदुराजा महाकाल अघोरी टीम'चा थरारक महाकाल शो सादर केला जाणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राची लोकप्रिय व प्रसिद्ध निवेदिका सौ. पूजा सातव यांच्या उपस्थितीत 'न्यु होम मिनिस्टर - सोहळा सख्यांचा, खेळ पैठणीचा' हा कार्यक्रम होणार आहे.

१८ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता भव्य लाईट ॲण्ड साऊंड शो आणि पंचक्रोशीतील महिलांचा दांडिया कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर रोजी महाष्टमी व महानवमी निमित्त दुपारी १२.४५ वाजता होम हवन, महानवमी पूजा होईल. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) पर्वकाळात सायंकाळ ५.३० वाजता शस्त्रपूजा, पारंपरिक वाजतगाजत पालखी मिरवणूक आणि रात्री फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात येणार आहे.

तसेच नवरात्रोत्सवानंतर २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत सुधाकर मधुकर सरोदे आणि पार्टी यांच्या दर्जेदार सादरीकरणाने देवीचा गोंधळ व कोजागिरी उत्सव साजरा केला जाणार आहे. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री क्षेत्र पद्मावती देवी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


 

0/Post a Comment/Comments