अहिल्यानगर : जिल्ह्यातील अति तीव्र कुपोषित (सॅम - SAM) बालकांच्या आरोग्य व पोषणस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी जिल्हा परिषद, अहिल्यानगर प्रशासनामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ जिल्ह्यातील सर्व 273 सॅम बालकांची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावरील विभागप्रमुख, वैद्यकीय अधिकारी आणि पर्यवेक्षिका यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत 16 ऑक्टोबर रोजी सर्व संबंधित पालक अधिकाऱ्यांनी बालकांच्या घरी प्रत्यक्ष गृहभेट देऊन त्यांच्या आरोग्याची व पोषणस्थितीची पाहणी केली. यावेळी प्रत्येक बालकासाठी एक महिन्याचा पुरेसा सकस आहार आणि त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिकाऱ्यांनी स्वत: केलेली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश सॅम बालकांना आवश्यक पोषण, वैद्यकीय उपचार आणि नियमित देखरेख उपलब्ध करून देऊन त्यांना सर्वसाधारण पोषण श्रेणीत आणणे हा आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व 273 बालकांना संबंधित अधिकारी दत्तक देऊन त्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही 273 बालके सकस आहार आणि औषधोपचाराने काही कालावधीनंतर सर्वसाधारण श्रेणी मध्ये गेल्यानंतर इतर अति तीव्र कुपोषित बालके आढळल्यास त्यांना देखील दत्तक घेण्याची ही चळवळ पूर्ण वर्षभर सुरू राहणार आहे.
गृहभेटीतून आरोग्य व पोषणस्थितीचा आढावा
गृहभेटीदरम्यान
पालक अधिकाऱ्यांनी बालकांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या आहाराच्या सवयी, आरोग्यविषयक गरजा आणि संगोपनाच्या
पद्धतींचा आढावा घेतला. बालकांना पुरेसा व सकस आहार मिळतो का, त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे का, तसेच आवश्यक
वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का, याची पाहणी करण्यात आली.
प्रत्येक बालकाला महिनाभर पुरेल इतका सकस आहार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यासाठी
आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
बालकांच्या आरोग्यविषयक गरजांनुसार वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकारी व अंगणवाडी सेविका यांच्या समन्वयाने कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे बालकांच्या पोषणाकडे केवळ आहारपुरवठ्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या आरोग्याच्या सर्वांगीण सुधारणेकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
कुपोषणमुक्त होईपर्यंत अधिकाऱ्यांची नियमित देखरेख
संबंधित
बालक सर्वसाधारण पोषण श्रेणीत येईपर्यंत त्याच्या आरोग्याची आणि पोषणाची जबाबदारी
नियुक्त पालक अधिकाऱ्यांकडे निश्चित करण्यात आली आहे. हे अधिकारी दर महिन्याला
किमान एकदा बालकाच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्याच्या वजनातील वाढ, पोषणस्थिती, आरोग्य
आणि उपचारांच्या प्रगतीची पाहणी करणार आहेत.
बालकाच्या आरोग्यात शाश्वत सुधारणा होऊन ते सर्वसाधारण पोषण श्रेणीत येईपर्यंत ही प्रक्रिया वर्षभर नियमितपणे राबविण्यात येणार आहे. गृहभेटी, सकस आहाराची उपलब्धता, वैद्यकीय तपासणी आणि नियमित निरीक्षण यांच्या माध्यमातून प्रत्येक बालकाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितले.
कुपोषण निर्मूलनासाठी प्रशासनाचा विशेष पुढाकार
बालकांच्या
आरोग्यपूर्ण वाढीसाठी पोषक आहार, वेळेवर
उपचार आणि कुटुंबीयांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन सेवा
संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाने २७३ अति तीव्र कुपोषित बालकांच्या
पोषणाची जबाबदारी निश्चित केली आहे. अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून आणि
आरोग्य व महिला-बालविकास यंत्रणांच्या समन्वयातून बालकांच्या पोषणस्थितीत सुधारणा
घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कुपोषित
बालकांना आवश्यक सकस आहार, वैद्यकीय
सुविधा आणि नियमित देखरेख उपलब्ध करून देत त्यांना सर्वसाधारण पोषण श्रेणीत आणणे,
तसेच त्यांच्या आरोग्यात दीर्घकालीन सुधारणा घडवून आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. सेवा संकल्प अभियानातून कुपोषण
निर्मूलनाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद, अहिल्यानगर
प्रशासनामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

Post a Comment