अहिल्यानगर - शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या दिल्लीगेट परिसरात खडी मुरूम वाहतूक करणाऱ्या हायवा ढंपरखाली सापडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १६ जुलै रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली आहे. प्रकाश नाना अवचर (वय ३२, रा. दातरंगे मळा, नालेगाव) असे मयत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी ढंपर चालकाविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा ढंपर हा नेप्ती नाका कडून दिल्लीगेट कडे येत असताना दिल्लीगेट वेशीच्या बाहेर असलेल्या शहर बस थांब्याजवळ या ढंपरने (क्र. एमएच १६ सीसी ८२४४) रस्त्याने पायी चाललेल्या प्रकाश अवचर यास धडक दिली. या धडकेत तो ढंपरच्या मागील चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला. त्याच वेळी दिल्लीगेट परिसरात असलेले त्याचे नातेवाईक राजकिरण कुमार पटेकर (रा. गौतम नगर, नीलक्रांती चौक) यांनी त्यास उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
या अपघातानंतर ढंपर चालक ढंपर तेथेच सोडून पसार झाला. या प्रकरणी राजकिरण पटेकर यांच्या फिर्यादी वरून तोफखाना पोलिसांनी ढंपर चालक ऋषी बैस (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मयत प्रकाश अवचर याच्या पश्चात आई, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
Post a Comment