शिवसेना ठाकरे गटाच्या नगर शहर प्रमुखावर बलात्काराचा गुन्हा दाखल, पोलिसांनी केली अटक

अहिल्यानगर - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगर शहरप्रमुख किरण गुलाबराव काळे विरोधात नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात २१ जुलै रोजी रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कर्जत येथील २१ वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी किरण काळे यांना अटक केली आहे.

पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, तिच्या पतीला दारू पिण्याचे व्यसन होते, त्यामुळे तिचा पती तिला सतत त्रास द्यायचा. सन २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी किरण काळे हे कर्जत येथे प्रचारासाठी गेले असता पिडीतेने त्यांना पाहिले होते. त्यांनी भाषणात गोरगरिबांना मदत करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पती सोबत असलेल्या वादात मदत मिळावी म्हणून तिने सोशल मिडीयावरून काळे यांचा मोबाईल नंबर मिळविला.त्यावर संपर्क करून पती पासून होणाऱ्या त्रासात मदत मागितली. सन २०२१ पासून ते फोनवर एकमेकांच्या संपर्कात होते. सन २०२३ मध्ये काळे यांनी तिला नगरमध्ये बोलावून घेतले. ती एसटी बसने आल्यावर काळे तिला घेण्यासाठी कार ने बसस्थानकाजवळ गेले. तेथून तिला कारमध्ये बसवून त्यांच्या चितळे रोड वरील संपर्क कार्यालयात नेले. तेथे पीडित महिलेला मदत करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधू लागले, त्यास पिडीतेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, मला विरोध करू नको मी तुला सर्व मदत करतो असे सांगत काळे याने तिच्यावर बलात्कार केला. ही बाब कोणाला सांगू नको नाहीतर माझ्या खूप ओळखी आहेत, तुला जिवंत सोडणार नाही असा दम देवून तिला पुन्हा बसस्थानकावर नेवून सोडले.

त्यानंतर २०२३ ते २०२४ पर्यंत पुन्हा ३ वेळा किरण काळे याने पिडीतेला स्वतःच्या संपर्क कार्यालयात बोलावून बलात्कार केला. तसेच ही गोष्ट कोणाला कळली तर जीवे मारण्याची धमकी किरण काळेकडून देण्यात येत होती. या काळात त्यांनी कुठलीही मदत केली नाही. या दरम्यान पिडीतेच्या पतीला तिचे किरण काळे सोबत संबंध असल्याचा संशय आल्याने तो तिला आणखी त्रास देवू लागला. किरण काळे हे मोठे राजकारणी असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास पिडीत महिला घाबरत होती. मात्र एक दिवस तिने तिच्या चुलत सासूला सर्व माहिती सांगितली. ही माहिती मिळाल्यावर तिने भिंगार मधील तिच्या ओळखीचे भीम आर्मी बहुजन एकता मिशन चे जिल्हाध्यक्ष पवन अशोक भिंगारदिवे यांना सर्व माहिती सांगितली. त्यांनी पिडीत महिला व तिच्या सासूला नगरला बोलावून घेतले. त्यांच्या कडून सर्व हकीकत ऐकून घेतल्यावर २१ जुलैला रात्री दोघींना घेवून कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास घेवून गेले. असे फिर्यादीत म्हटले आहे.

पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात किरण काळेविरोधात भा.दं.वि.कलम ३७६ (), ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी किरण काळे यास अटक केली आहे. पुढील तपास महिला स.पो.नि. तेजश्री थोरात या करत आहेत. 

0/Post a Comment/Comments