१२ वर्षाच्या लढ्याला यश, नगरच्या परिवाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिला सातबारा



नगर - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील धनगर समाजाच्या ७० वर्षीय महिला भगिनी कौसाबाई मारुती सरोदे यांच्या बहुचर्चित ५१ गुंठे जमीन चोरी प्रकरणी बारा वर्षापासून अनेक वेळा तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय येथे उपोषण करून ही न्याय मिळत नसल्याने मागील महिन्यात ९ दिवस घर संसार शेळ्या/मेंढ्या घेऊन सरोदे परिवार व चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी अहिल्यानगर तहसील कार्यालय परिसरात बेमुदत आंदोलनाला बसले होते. या शेळी -मेंढी घर प्रपंच घेऊन तहसील कार्यालयात केलेल्या अनोख्या आंदोलनाची जिल्हा भर जोरदार चर्चा झाली होती.

अहिल्यानगर तहसील कार्यालयातील आंदोलनाची माहिती युवानेते शिवसैनिक पांडुरंग दातीर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दिली. गृहराज्यमंत्री कदम यांनी तात्काळ जिल्हाधिकारी व अहिल्यानगरचे तहसीलदार यांना संपर्क करून त्वरित योग्य कारवाईचे आदेश दिले.

 बारा वर्षापासून जमीन चोरी प्रकरणी प्रलंबित असणाऱ्या या प्रकरणाकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सदर व्यक्तीने राजकीय हस्तक्षेप करून प्रशासनावर दबाव आणून  बेकायदेशीरपणे कुठेही खरेदी खत न करता स्वतःच्या नावावर केलेली जमीन परत कौसाबाई सरोदे यांच्या नावावर करून देण्यास प्रशासन टाळाटाळ करत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या आंदोलनाची दखल घेताच आंदोलन स्थळी तहसीलदार यांनी सदर जमीन कौसाबाई सरोदे यांच्या नावावर करण्याचा फेरफार दुरुस्तीचा आदेश दिला व अनेक दिवसांपासून सुरू असलेले घर प्रपंच शेळी मेंढी तहसील कार्यालयातील आंदोलन त्वरित थांबले होते.

याबाबत मंगळवारी (दि.२९) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सरोदे परिवाराला या जमिनीचा सातबारा देण्यात आला. यावेळी या दोघांचा धनगर समाजाचे प्रतीक असलेले घोंगडी, पिवळा फेटा, भंडारा, देऊन सन्मान केला व सरपंच व सरोदे परिवाराने उपस्थित मंत्री भरत गोगावले,उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार चित्राताई वाघ या सर्वांचे ऋण व्यक्त केले.

सरपंच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, युवानेते शिवसैनिक पांडुरंग दातीर, अहिल्यानगरचे प्रांत सुधीर पाटील,अपर तहसीलदार स्वप्निल ढवळे, तहसीलदार संजय शिंदे यांचे आभार मानले .

यावेळी कौसाबाई सरोदे, सूर्यभान सरोदे व त्यांचे परिवार,सरपंच शरद पवार,चंद्रकांत पवार,अभिषेक कदम,युवराज हजारे.किरण मोरे आदि  मंत्रालय मुंबई येथे उपस्थीत होते.

0/Post a Comment/Comments