अहिल्यानगर - पहाटेच्या वेळी लोखंडी रॉड व गिलवर घेवून महिलेच्या घरात घुसत तिला मारहाण करत तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच घरासमोरील मोपेड असा २ लाख ९० हजारांचा ऐवज चार अनोळखी चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना केडगाव उपनगरात लिंक रोड वर असलेल्या पोद्दार शाळेजवळील सिद्धांत पार्क येथे १६ सप्टेंबर रोजी पहाटे २.२३ च्या सुमारास घडली आहे.
याबाबत दुर्गा भागवत सोनार (वय ३८, रा. सिद्धांत पार्क, लिंक रोड, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या रात्री घरात झोपलेल्या असताना १६ सप्टेंबर रोजी पहाटे २.२३ च्या सुमारास ४ अनोळखी चोरटे हे हातात लोखंडी रॉड व गिलवर घेवून त्यांच्या घरात घुसले. त्यांनी फिर्यादी यांना हत्यारांचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावण्याचा प्रयत्न करू लागले असता, फिर्यादीने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकाने गिलवरीने त्यांना दगड फेकून मारले, तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर अंगावरील सोन्याचे दागिने तसेच घरासमोरील सुझुकी कंपनीची मोपेड असा २ लाख ९० हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला.
या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने, कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे स. पो.नि. तेजश्री थोरात यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी दुर्गा भागवत सोनार यांच्या फिर्यादी वरून अनोळखी ४ चोरट्यांच्या विरुद्ध बीएनएस कलम ३०९(६), ३११, ११५ (२), ३५१ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment