नगर जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोऱ्या करणाऱ्यांवर देव कोपला, अखेर ८ मंदिरे फोडणारी टोळी जेरबंद


अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्हयात मंदिरांत होणाऱ्या चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवत एक टोळी जेरबंद केली आहे. या टोळीकडून जिल्ह्यातील ८ मंदिरांमधील चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी त्यांच्या कडून ३२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिपक रावसाहेब कचरे (वय २४), किरण बाळासाहेब राऊत (वय २०), अजय उर्फ लाल्या वसंत बनसोडे (वय १८, सर्व रा. नेहरुनगर, लोहगाव, ता. राहाता) अशी या आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यात अलीकडच्या काळात विविध मंदिरात चोऱ्या वाढल्या आहेत. या चोऱ्या रोखण्यासाठी आणि आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना दिले होते.

त्यानुसार त्यांनी पोलिस अंमलदार राहुल व्दारके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, दिपक घाटकर, रिचर्ड गायकवाड, भिमराज खर्से, रमीजराजा आतार, सुनिल मालणकर यांचे विशेष पथक नियुक्त केले. या पथकाने तपास सुरु केल्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्हयातील आरोपीबाबत गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे माहिती काढून आरोपी दिपक कचरे याला निष्पन्न केले. तो भुईकोट किल्ला मैदान, भिंगार येथे येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचुन त्याला पकडले.

त्याच्या कडे कसून चौकशी केल्यावर त्याने किरण राऊत, अजय उर्फ लाल्या बनसोडे यांच्या समवेत नगर तालुक्यात मंदिरात चोरी करून दानपेटीतील ७१ हजार रुपये वाटुन घेतल्याची माहिती दिली. त्याच्या दोन्ही साथीदारांनाही पकडल्यावर तिघांनी जिल्ह्यात नगर तालुका, शिर्डी, राहुरी, श्रीरामपूर तालुका, घारगांव (संगमनेर) या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ८ मंदिरांत चोऱ्या केल्याची कबुली दिली. या तिघाही आरोपींना हस्तगत मुद्देमालासह पुढील तपासासाठी नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments