बीड - अनेक वर्षांची प्रतीक्षा, तीन पिढ्यांचे स्वप्न आणि अथक प्रयत्नांनंतर अखेर आज बुधवारी (१७ सप्टेंबर)मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर बीडच्या भूमीवर रेल्वे धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. बीड ते अहिल्यानगर रेल्वेमार्गावर पहिली गाडी धावल्यामुळे बीड जिल्ह्याचा रेल्वे नकाशावर समावेश झाला आहे.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे आणि जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बीडकरांनी मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती.
गेल्या ३०-३५ वर्षांपासून बीड जिल्ह्यात रेल्वे यावी, ही येथील जनतेची मागणी होती. दळणवळणाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून रेल्वेचे महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे. बीडकरांचे हे स्वप्न दिवंगत नेत्या केशरकाकू क्षीरसागर यांनी पहिल्यांदा पाहिले आणि त्याची मागणी केली होती. त्यानंतर, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनीही त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
आज या स्वप्नाची पूर्तता झाल्याचा आनंद बीडकरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक नवीन रेल्वे पाहण्यासाठी आले होते. अनेकांनी रेल्वेसोबत सेल्फी घेतले, फोटो काढले आणि हा अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद केला.
Post a Comment