पैठण - छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील खादगाव येथील ४५ वर्षीय शेतकरी संजय शेषराव कोहकडे यांनी मंगळवारी (१६ सप्टेंबर) दुपारी अडीच वाजता महसूल अधिकाऱ्यांसमक्ष विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कोहकडे यांनी शेतात पाणी साचत असल्यावरून त्यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीवर पंचनामा करण्यासाठी बालानगरचे मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे हे घटनास्थळी आले असताना त्यांच्या समोरच कोहकडे यांनी विहिरीत उडी घेतली.
कोहकडे यांची शेती खादगाव-खेर्डा रस्त्यालगत आहे. दोन्ही बाजूंनी नालीचे खोदकाम झाल्याने त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. तसेच शेतात पाणी साचू लागले. त्यांनी याबाबत अनेकदा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. अधिकारी पंचनामा करत असताना कोहकडे यांनी आपली व्यथा सांगितली. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांनाच झापल्याने ते संतापले. त्यांनी थेट विहिरीकडे धाव घेत अधिकाऱ्यांसमोरच उडी घेतली. काहींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर कोहकडे यांचे नातेवाईक आक्रमक झाले. मंडळ अधिकारी, तलाठी आणि संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. पाचोड ग्रामीण रुग्णालयात त्यांनी उत्तरीय तपासणीस नकार दिला. स.पो.नि. सचिन पंडित, उपनिरीक्षक राम बारहाते यांनी रुग्णालयात धाव घेतली. नातेवाइकांशी चर्चा करून कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी उत्तरीय तपासणीस परवानगी दिली.
Post a Comment