अहिल्यानगर
(प्रतिनिधी) - कोतवाली पोलीस ठाण्यात
मध्यरात्री मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून
शिवसेना ठाकरे गटाचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण गुलाबराव काळे व त्यांचा भाऊ
नितीन गुलाबराव काळे (रा. भुतकरवाडी, सावेडी) यांनी सरकारी कामात अडथळा आणत पोलीस कर्मचार्यांना
धक्काबुक्की, शिवीगाळ तसेच धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, यासंदर्भात पोलीस अंमलदार
रामनाथ हंडाळ यांच्या फिर्यादीवरून किरण काळे व नितीन काळे यांच्याविरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंमलदार हंडाळ हे कोतवाली पोलीस ठाण्यात नेमणुकीस असून
मंगळवारी (16 सप्टेंबर) रात्री 8 वाजल्यापासून ते बुधवारी (17 सप्टेंबर) सकाळी 8 वाजेपर्यंत ठाणे अंमलदार मदतनिस म्हणून ड्युटीवर होते.
त्यांच्यासोबत अंमलदार यु. ए. गायकवाड ठाणे अंमलदार म्हणून तर महिला अंमलदार पूजा
दिग्गत सीसीटीएनएस ड्युटीवर होत्या.
दरम्यान, बुधवारी पहाटे 12.40 वाजता
महेंद्र संतोष उपाध्याय (रा. केडगाव, अंबिकानगर) यांनी नितीन
काळे यास कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. त्या वेळी नितीन काळे हा मादक पदार्थांच्या
अमलाखाली असल्याचे निदर्शनास आले. तक्रार नोंदवित असताना नितीन काळे यांनी
पोलिसांवर धावून जात शिवीगाळ व धक्काबुक्की केली. घटनास्थळी नितीनचा भाऊ शहर
प्रमुख किरण काळे हे देखील आले. त्यांनी तक्रारदार उपाध्याय यांना उद्देशून तु
संग्राम जगताप याचा कुत्रा आहे, तो काय माझे वाकडे करणार असे
म्हणत शिवीगाळ करत त्याच्या अंगावर धावून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर
त्यांनी उपाध्याय यांच्यावर धावून जाऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान,
रात्र गस्तीवरील अंमलदार संदीप पितळे, संकेत
धिवर, गायकवाड तसेच इतरांनी सोडवण्याचा प्रयत्न केला.
मात्र
नितीन काळे व किरण काळे यांनी पोलिसांवरही शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. एवढेच
नव्हे तर तुम्ही येथे नोकरी कशी करता तेच पाहतो अशी धमकी दिली. या प्रकारामुळे
पोलीस ठाण्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी येऊन शांतता राखण्याचे निर्देश दिले.
सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांवर
हल्ला करणे तसेच धमक्या दिल्याप्रकरणी नितीन काळे व किरण काळे यांच्याविरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment