मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून तीन अज्ञात चोरट्यांनी सिनेस्टाईलने २ लाखांची केली लूट



श्रीरामपूर (प्रतिनिधी) - श्रीरामपूर शहरातील मोरगेवस्ती येथे मध्यरात्री घरात घुसून तीन अज्ञात चोरट्यांनी सिनेस्टाईलने 2 लाखांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी हेमलता कोकाटे, (वय 44) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, आई सुशिला आणि वडील रामचंद्र यांच्यासह रात्री 10 वाजता जेवण करून हॉलचा दरवाजा आतून बंद केला. नंतर त्या आणि आई हॉलशेजारी असलेल्या बेडरूममध्ये झोपल्या. वडील वरच्या बेडरूममध्ये झोपायला गेले. पहाटे 3 वाजता काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने हेमलता उठल्या असता, समोर तोंडाला काळा मास्क बांधलेले आणि अंगात काळे कपडे घातलेले तिघेजण दिसले.

त्यांच्या हातात चाकू, गज, चॉपर होते. त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला असता, एकाने चाकू दाखवून त्यांना खाली बसवले व तू जर ओरडली तर ठार मारील अशी धमकी दिली. त्याचवेळी त्यांची आई बाथरूममधून बाहेर आली असता, दुसर्‍या एका चोरट्याने आईला चाकू दाखवून कानातील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने काढायला लावले. त्यानंतर बेडरूममधील कपाट टॉमीच्या सहाय्याने तोडून सोन्याच्या बांगड्या, कर्णफुले असा सुमारे 1 लाख 94 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी तीन अनोळखी चोरांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

0/Post a Comment/Comments