नगर तालुका (प्रतिनिधी) - अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिचोंडी पाटील येथील उपबाजारात आधुनिक शेतकरी भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने या प्रकल्पासाठी १ कोटी ६२ लाख ४१ हजार ५१६ रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून, यासंदर्भातील शासन निर्णय ७ मे रोजी निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती आमदार अक्षय कर्डिले यांनी दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना मुक्कामासाठी जागा नसणे, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, विश्रांती व्यवस्था यांचा अभाव जाणवत असल्याने ही योजना राबविण्यात येत आहे. अहिल्यानगर बाजार समितीने स्वर्गीय माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सचिव अभय भिसे यांनी सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता.
शासनाने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकात मुख्य बांधकामासाठी १ कोटी २५ लाख ८२ हजार ८५६ रुपये, जीएसटीसाठी २२ लाख ६४ हजार ९१४ रुपये, विद्युत व्यवस्था खर्च ६ लाख २९ हजार १४३ रुपये, गुणवत्ता तपासणी शुल्क, कामगार विमा, अतिरिक्त रॉयल्टी आणि आकस्मिक खर्चाचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे शासनाने निश्चित केलेल्या मॉडेल खर्चापेक्षा हा प्रकल्प अधिक खर्चाचा असल्याने शासनाकडून ७६.४६ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान दोन टप्प्यांत वितरित केले जाईल. उर्वरित निधी बाजार समितीला स्वनिधी अथवा कर्जाच्या माध्यमातून उभारावा लागणार आहे.
या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याकडून तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल. शासनाने हे बांधकाम प्रशासकीय मान्यता मिळाल्यापासून एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
स्वर्गीय माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र व नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांनी पाठपुरावा केला होता. या आधुनिक शेतकरी भवनामुळे बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी बांधवांना सुरक्षित व सुसज्ज निवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचा वेळ, खर्च आणि गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.

Post a Comment