अहिल्यानगर - नगर - सोलापूर महामार्गावर आंबिलवाडी (ता.नगर) शिवारात झालेल्या भीषण अपघातात जामखेड येथील अँड. विराज भगवान जायभाय (वय २५, रा. शिक्षक कॉलनी, जामखेड) व ऋषिकेश उर्फ सोनू बाळासाहेब डुचे (वय २४, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड येथील ज्येष्ठ विधिज्ञ अँड. भगवान जायभाय यांचे सुपुत्र अँड. विराज जायभाय हे पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. मोठ्या भावाच्या विवाहासाठी ते जामखेड येथे आले होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर ११ मे रोजी पहाटे च्या सुमारास विराज जायभाय, सोनू डुचे व पुणे येथील एक मित्र असे तिघेजण आय-२० कारमधून (क्र.एमएच १७ एझेड ३२४२) पुण्याकडे निघाले होते.
सोलापूर महामार्गाने ने अहिल्यानगरच्या दिशेने येत असताना आंबिलवाडी शिवारातील वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने भरधाव कार रस्ता सोडून अनेक पलट्या खात शेतात घुसली. अपघात इतका गंभीर होता की अँड. विराज जायभाय व सोनू डुचे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला पुणे येथील मित्र गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी तातडीने गाडीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढून जामखेड येथे संपर्क साधत घटनेची माहिती दिली. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जामखेड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment