गुणवडी – रुईछत्तीसी रोडवर थरार...दोघा दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावत पळविले


नगर तालुका (प्रतिनिधी) – नगर शहर परिसरात जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, ग्रामीण भागातही या घटना होवून लागल्या आहेत. नगर तालुक्यातील गुणवडी शिवारात रुईछत्तीसी रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या दोघांनी हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पार्वती महादेव खेडके (वय ४९, रा. गुणवडी, ता. नगर) यांनी ११ मे रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या सायंकाळच्या सुमारास गुणवडी शिवारात रुईछत्तीसी ते गुणवडी रस्त्याने पायी जात असताना समोरून एका दुचाकीवर दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी महिलेसमोर दुचाकी थांबवून 'हा रस्ता नगरला जातो का?' अशी विचारणा केली. महिलेला काही समजण्याच्या आतच, दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४८ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत बळजबरीने ओढली आणि चोरून नेली.

घटनेनंतर पीडित महिलेचे नातेवाईक पुण्यात असल्याने तक्रार देण्यास विलंब झाला. मात्र, आता या प्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.


 

0/Post a Comment/Comments