अहिल्यानगर - घरकामासाठी ठेवलेल्या मोलकरणीनेच घराची सफाई करण्याऐवजी घरातील मौल्यवान ऐवजाची 'हातसफाई' केल्याची घटना नगर शहरातील आनंदधाम समोर असलेल्या अर्चना अपार्टमेंटमध्ये उघडकीस आली आहे. या मोलकरणीने ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लता रतनलाल बोरा (वय ७८ वर्षे, रा. फ्लॅट नंबर २, अर्चना अपार्टमेंट, आनंदधाम समोर, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अंजली (पूर्ण नाव व पत्ता माहीती नाही, रा. सारसनगर, अहिल्यानगर) या आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १०.३० वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घरी ही चोरीची घटना घडली. आरोपी महिला फिर्यादी यांच्या घरी घरकामास असताना तिने फिर्यादी यांची नजर चुकवली. बेडरूमच्या कपाटाच्या कप्प्यातील सुमारे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या धातूचा बेल्ट असलेले मनगटी घड्याळ, ज्याची किंमत ६५ हजार रुपये आहे, ते चोरून नेले.
तसेच कपाटातील ४ हजार ५०० रुपये रोख रक्कम,याशिवाय बेडवर ठेवलेला ५ हजार रुपये किमतीचा नोकिया कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल फोनही चोरून नेला. असा एकूण ७४ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज आरोपी महिलेने लंपास केला आहे. घरकामाला असलेल्या आरोपी महिलेकडे फिर्यादी यांनी वारंवार चोरी केलेल्या ऐवजाची मागणी केली होती. मात्र, आरोपी महिलेने चोरी केलेला ऐवज परत न दिल्याने फिर्यादी यांनी अखेर १८ नोव्हेंबर रोजी रात्री कोतवाली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वाती तोरडमल करत आहेत.

Post a Comment