पोलीस ठाण्याच्या आवारातच चौघांचा फुल्ल ‘राडा’,आपसात शिवीगाळ आणि गचांडागचांडी


अहिल्यानगर - पोलीस ठाण्याच्या आवारातच चार जणांनी आपसात आरडाओरडा करत शिवीगाळ व झटापट केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संबंधित चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव माधव हराळे (वय ५५), केतन नामदेव हराळे, निखील नामदेव हराळे (सर्व रा. पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) आणि राहुल सुनिल शिंदे (रा. बुरुडगाव/बुऱ्हाणनगर रोड, नागरदेवळे फाटा, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार वैभव मच्छिंद्र झिने हे अन्य सहकाऱ्यांसह ठाणे अंमलदार कक्षात दैनंदिन कामकाज करत होते. त्याच वेळी कक्षाबाहेर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठा आरडाओरडा ऐकू आला. अंमलदार झिने आणि हवालदार गव्हाणे यांनी बाहेर जाऊन पाहिले असता, वरील चार इसम आपसात शिवीगाळ करत एकमेकांशी झुंज करताना दिसून आले. पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी करत त्यांची सोडवणूक केली आणि नावे व पत्ते विचारून ताब्यात घेतले.

सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच थेट पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता भंग केल्याप्रकरणी पोलीस अंमलदार वैभव झिने यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून चौघांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १९४(२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बापूसाहेब मस्के या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments