अहिल्यानगरमध्ये चाललंय काय ? नगरसेवकापाठोपाठ वकिलाचे घर फोडले, लाखोंचा ऐवज लंपास



अहिल्यानगर - शहरातील सावेडी परिसरातील चोऱ्या घरफोड्यांचे सत्र थांबता थांबेना, २ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब पवार आंनी त्यांच्या शेजाऱ्याच्या घरी भरदिवसा चोरी झाल्याची घटना ताजी असताना आता सावेडीतीलच ऐक्य नगर भागात वकिलाच्या घरात मोठी चोरी झाल्याचे समोर आले आहे, चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व घराच्या बाहेर लावलेली मोटारसायकल चोरून नेली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ज्येष्ठ वकील मधुसूदन पांडुरंग गात (वय ६३, रा. ऐक्य नगर, भारत गॅस गोडाऊन जवळ, सावेडी,अहिल्यानगर) यांनी १४ नोव्हेंबर रोजी पहाटे तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे दिवाळी सुट्टी निमित्त १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घराला कुलूप लावून बाहेर गावी गेलेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी  १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून ते १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान ऐक्य नगर येथील भारत गॅस गोडाऊनजवळ असलेल्या फिर्यादी यांच्या बंद घराचे गेट व दरवाज्याचे कुलूप तोडले.

त्यांनी घरात बेकायदेशीर प्रवेश करून फिर्यादीच्या घरातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गळ्यातील मंगळसूत्र, आठ ग्रॅम वजनाचे दोन नग सोन्याचे कानातील टॉप्स, ५० हजार रुपये रोख रक्कम (५०० रुपयांच्या नोटा) आणि घराच्या कंपाऊंड मध्ये लावलेली हिरो कंपनीची एक्स्ट्रीम १६० आर ही काळ्या रंगाची मोटरसायकल (क्र. एमएच१६डीवाय४१३३) असा मुद्देमाल चोरून नेला.

या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तोफखाना पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य आणि महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, श्वान पथक, तसेच ठसे तज्ञांचे पथक दाखल झाले. त्यांनी पाहणी करत पंचनामा केला आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४), ३३१ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करत आहेत.

0/Post a Comment/Comments